
टाटा ट्रस्ट्स देशात उभारणार ४० ते ५० नवी रुग्णालये
पाच वर्षांचा आरोग्य आराखडा जाहीर; २५ लाख लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट
मुंबई : देशातील आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट्सने देशभरात ४० ते ५० ना-नफा तत्त्वावरील सर्वसाधारण रुग्णालयांचे जाळे उभारण्याची योजना आखली आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी संस्थेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली. या रुग्णालयांमध्ये उपचारांचा खर्च परवडणाऱ्या रुग्णांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या मॉडेलमध्ये उपचारांचा खर्च देऊ शकणाऱ्या रुग्णांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी केला जाईल. त्यामुळे आरोग्यसेवेचा दर्जा कायम राखत अधिकाधिक रुग्णांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा ट्रस्ट्सचा प्रयत्न असेल.
पाच वर्षांत २५ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
टाटा ट्रस्ट्सने २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी आरोग्यसेवेचा पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत देशातील सुमारे ७५ ब्लॉक्समधील २५ लाखांहून अधिक लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय १०० हून अधिक सरकारी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामीण आणि आरोग्यसेवा तुलनेने कमी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये प्राथमिक उपचारांची उपलब्धता वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांचाही या आराखड्यात समावेश आहे.
कर्करोग उपचारांच्या जाळ्याचा विस्तार
कर्करोगावरील उपचार रुग्णांच्या घराजवळ उपलब्ध व्हावेत, यासाठी टाटा ट्रस्ट्सच्या कॅन्सर केअर नेटवर्कचा विस्तार सुरू राहणार आहे. संस्थेच्या अहवालानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर्करोग उपचार कार्यक्रमांतर्गत १,०६,६२६ रुग्णांना बाह्यरुग्ण वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच २४,८७४ केमोथेरपी सत्रे पार पडली आणि २,८७९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कर्करोगाच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागणाऱ्या रुग्णांचा प्रवास आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर उपचारांची सुविधा वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खर्चापेक्षा सामाजिक परिणामांना प्राधान्य
टाटा ट्रस्ट्सच्या कार्यपद्धतीबाबत भूमिका स्पष्ट करताना नोएल टाटा यांनी केवळ किती निधी खर्च झाला किंवा किती लोकांपर्यंत मदत पोहोचली, याऐवजी त्या कामामुळे समाजात नेमका काय बदल घडला, याला महत्त्व दिले पाहिजे, असे नमूद केले. सामाजिक क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन प्रत्यक्ष परिणाम आणि दीर्घकालीन प्रभावाच्या आधारे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
भारतातील गुणवंत तरुणांना देशातच जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दर्जेदार शैक्षणिक आणि आरोग्यविषयक संस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल या संस्थांचा उल्लेख करत त्यांनी संस्था उभारणीच्या परंपरेवर भर दिला.
टाटा ट्रस्ट्सच्या या योजनेमुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्ताराची दिशा निश्चित झाली असली, तरी प्रस्तावित रुग्णालयांची ठिकाणे, त्यासाठीची एकूण गुंतवणूक आणि उभारणीचे स्वतंत्र वेळापत्रक याबाबत वार्षिक अहवालात तपशील देण्यात आलेला नाही.







