गोव्यात अॅक्वारियम (सागरी मत्स्यालय) उभारण्याच्या कल्पनेचा पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
गोव्यातील शिष्टमंडळाशी बोलताना मंत्री सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. या शिष्टमंडळात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा समावेश होता.
गोव्यातील पर्यटन आणि समुद्राशी संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध संभाव्य प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी खासदार नाईक आणि मंत्री खंवटे यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.
खंवटे आणि त्यांच्या टीमने सिंह यांच्यासमोर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या विविध योजनांतर्गत काही प्रस्ताव ठेवले. सिंग यांनी या प्रस्तावांची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले की, आधीच्या सरकारांनी भारतातील विशाल सागरी संसाधनांचा शोध घेण्याकडे लक्ष दिले नाही. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सागरी संसाधनांचा शोध घेण्याचा आणि त्यांचा वापर करण्याला प्राधान्य दिले.
ब्लू इकॉनॉमीतून होत असलेल्या विकासाच्या क्षमतेची दखल घेतली गेली. ब्लू इकॉनॉमीमुळे आगामी 25 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठी वाढ होऊ शकते.
केंद्रीय मंत्र्यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला सांगितले की, ब्लू इकॉनॉमीचा उद्देश स्मार्ट, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास हाच आहे. यातून हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी आर्थिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि सागरी संसाधने, संशोधन आणि विकासाच्या शाश्वत उपयोगासाठी योग्य कार्यक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे.
दरम्यान, गोव्याचे प्रस्ताव ऐकून घेतल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी मंत्री सिंग यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, भूविज्ञान मंत्रालय गोवा सरकारच्या प्राधान्यक्रमांना सामावून घेण्याबाबत आघाडीवर आहे.
दरम्यान, गोव्यातील मीरामार येथे 10 वर्षांहून अधिक काळापूर्वी Oceanarium (महासागर मत्स्यालय) उभारण्याचा प्रस्ताव होता, जो प्रत्यक्षात आला नाही.