
गोवा
लोबो दाम्पत्यांवर तक्रार दाखल
पणजी :
पर्रा येथे बेकायदेशीररित्या भराव टाकून जमीन बुजवल्याप्रकरणी शहर आणि नगरनियोजन खात्याच्यावतीने गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि आमदार दिलायला लोबो या दांपत्यावर म्हापसा पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला आहे. टीसीपीची गेल्या आठवड्याभरातील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी वाघेरी, हडपडे या ठिकाणीही नगरनियोजन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
माजी मंत्री मायकल लोबो सध्या काँग्रेसकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लक्ष्य करत मंत्री राणे यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत काँग्रेसचे विद्ध्वंसाचे ध्येय आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही असे म्हणत लोबो यांच्यावर कारवाई केल्याचे ट्विट मंत्री राणे यांनी केले आहे. यावरून आता राजकारण तापणार हे स्पष्ट आहे.
काय आहे नेमका विषय?
पर्रा येथे परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात जमीन बुजवली आहे. याबरोबरच या ठिकाणची झाडेही तोडण्यात आली आहेत. यामुळे नगरनियोजन कायदा 1975 कलम 17 अ, 17 ब चे उल्लंघन झाले आहे. तसेच वृक्ष वृसंवर्धन कायदा 1984 चेही उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.