देश/जग

‘भारत काही बनाना रिपब्लिक नाही’

राहुल गांधींवर जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाविरोधात (एसआयआर) ‘इंडिया’ आघाडीने आयोजित केलेल्या महारॅलीवरून भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांनी या आंदोलनाला ‘लोकशाहीच्या नावाखाली अराजकता निर्माण करण्याचा नियोजित कट’ असे संबोधले. तसेच, “भारत काही बनाना रिपब्लिक नाही,” अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांना सुनावले.

रामलीला मैदानावर रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या या सभेच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या राजकारणावर टीका केली. जनतेने वारंवार नाकारलेल्या विरोधी पक्षांकडून हे राजकीय नाटक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीचा आदर करण्याऐवजी देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न या आंदोलनातून होत असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या राजकारणाचे चार टप्पे असल्याचा दावा नड्डा यांनी केला. पहिल्या टप्प्यात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणे, दुसऱ्या टप्प्यात रस्त्यावर गोंधळ आणि अराजकता निर्माण करणे, तिसऱ्या टप्प्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणे आणि चौथ्या टप्प्यात परकीय शक्तींच्या मदतीने निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे, असा आरोप त्यांनी केला.

“राहुल गांधी, हे भारत आहे. हा काही असा देश नाही की, येथे मनाला वाटेल तेव्हा जाळपोळ घडवून आणावी, दंगली भडकवाव्यात किंवा सत्ताबदलाचा डाव आखावा. भारत ही जगातील सर्वांत जुनी आणि मजबूत लोकशाही आहे. देशाचे संचालन संविधान आणि जनतेच्या कौलानुसारच होईल,” असे नड्डा म्हणाले.

१९८४ च्या दंगलींचा संदर्भ

१ नोव्हेंबर या तारखेला काँग्रेसने महारॅली आयोजित केल्याबद्दलही नड्डा यांनी आक्षेप घेतला. १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या आठवणी या दिवशी ताज्या होत असताना काँग्रेसने राजकीय कार्यक्रम आयोजित करणे शीख समाजाच्या भावनांप्रती असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली. या दंगलींमध्ये हजारो शीख नागरिकांना जीव गमवावा लागला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, असे सांगत गांधी कुटुंबाने शीख समाजाची मनापासून माफी मागितलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा

दिल्लीतील सणासुदीच्या काळातील व्यापारी व्यवहारांवर या रॅलीचा परिणाम होईल, असा दावाही नड्डा यांनी केला. धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात लहान दुकानदार, फेरीवाले आणि व्यापाऱ्यांसाठी मोठी उलाढाल होत असते. अशा वेळी मोठ्या राजकीय सभेमुळे बाजारपेठांमधील व्यवहार विस्कळीत होऊ शकतात, असे ते म्हणाले.

दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या संघटनेने राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून सणासुदीच्या काळात मोठ्या सभा आयोजित करू नयेत, अशी विनंती केल्याचा दावाही नड्डा यांनी केला. मात्र, विरोधकांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करत मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच एसआयआर प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात ‘इंडिया’ आघाडीने ही महारॅली आयोजित केली आहे. त्यामुळे या आंदोलनावरून भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!