google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

का म्हटले जाते नितीश बाबू -चंद्रबाबू नायडू यांना किंगमेकर?

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवातील निकालाने अनेकांना धक्का दिला. भारतीय जनता पक्षाची बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झाली. तर त्यांच्या नेतृत्वातील एनडीएने (NDA) 292 जागा मिळवल्या. तर इंडिया आघाडीने अनपेक्षित कामगिरी केली. आघाडीने 234 जागांवर विजयाची मोहर उमटवली. निकालानंतर एनडीए सरकार सत्ता स्थानी असेल असे स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने 2014 आणि 2019 मध्ये सहज बहुमत मिळवले होते. एका दशकात पहिल्यांदा भाजपला बहुमताचा आकडा गाठताना दम लागला. त्यामुळे आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांना किंगमेकर म्हटले जात आहे. त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (TDP) 1996 मध्ये पहिल्यांदा एनडीएमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांचे सरकार आयटी गव्हर्नंससाठी ओळखले गेले होते. पण पुढे 2018 मध्ये त्यांनी एनडीएला रामराम ठोकला. त्याचा त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला. 2018 मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टीडीपीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. तर 2019 मध्ये आंध्रप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये टीडीपीने पुन्हा एकदा एनडीएची वाट धरली. त्याचा फायदा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिसून आला. चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने आंध्र प्रदेश विधानसभेतील 175 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या 16 जागा लिलया खिशात घातल्या. त्यामुळे नायडू दोन दशकात पहिल्यांदा किंगमेकरच्या भुमिकेत पुढे आले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत.आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे. इंडिया आघाडीत कदाचित चांगल्या पदाची, मंत्रालयाची ऑफर त्यांना देण्यात येऊ शकते.

तर सुत्रांच्या माहितीनुसार, चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची एनडीएकडे मागणी केली आहे. काही खास मंत्रालय पण पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका भाजपचे टेन्शन वाढवू शकते.

गेल्या वर्षांच्या अखेरीस नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली होती. ते पंतप्रधान पदाचे संभावित दावेदार होते. पण लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी एनडीएमध्ये टुणकन उडी घेतली. नितीश कुमार केव्हा कोणती भूमिका घेतील याचा कुणालाच भरवसा नाही. त्यांनी सातत्याने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतली आहे. कधी भाजपकडे तर कधी काँग्रेसशी जवळीक असा त्यांचा दोन्ही पक्षांशी घरोबा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका विशेष चर्चेत आहे. त्यांना राजकारणात पलटूराम म्हणून पण बिरुदावली लावण्यात आली आहे. पण राजकारणात त्यांना नाकारुन मोठ्या पक्षांना पुढे जाता येत नाही हे पण तितकेच खरे. 2022 मध्ये नितीश कुमार यांनी लालप्रसाद यादव आणि इतरांसोबत मिळून महागठबंधनचा प्रयोग केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीचा प्रयोगाचे आवतान त्यांनीच धाडले होते. पण 2024 मध्ये त्यांनी भूमिका बदलवली. लोकसभेत 12 जागा जिंकून नितीश कुमार यांनी राजकारणातील त्यांचा मुरब्बीपणा दाखवून दिला आहे. त्या जोरावर ते चंद्रबाबू नायडूसारखेच किंगमेकर ठरले आहेत. फायदा आणि नुकसानीची भीती नितीश कुमार यांना नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे एनडीएत कायम राहतात की इंडिया आघाडीत सहभागी होतात, हे लवकरच दिसून येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!