‘कांटे’चे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
मुंबई : ‘कांटे’, ‘शूटआउट अॅट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) निधन झाले. मुंबईतील वर्सोवा येथील निवासस्थानी डोक्याला दुखापत झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते ५७ वर्षांचे होते.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शनिवारी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे गुप्ता यांच्या निधनाची माहिती दिली. गुप्ता यांचे निधन ही चित्रपटसृष्टीची मोठी हानी असल्याचे सांगत पंडित यांनी त्यांना उत्साही व्यक्तिमत्त्वाचे आणि चित्रपटांवर मनापासून प्रेम करणारे दिग्दर्शक म्हणून श्रद्धांजली वाहिली.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, वर्सोवा येथील राहत्या घरातील स्वयंपाकघरात घसरून पडल्याने गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबीयांना ते नंतर आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.
घटना घडली तेव्हा गुप्ता यांची पत्नी, दोन मुले आणि घरातील एक मदतनीस निवासस्थानी उपस्थित होते. मात्र, ते झोपेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या अंडरवर्ल्डवरील चित्रपटांमुळे ओळख
संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात संजय दत्त, आदित्य पांचोली आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीत त्यांनी गुन्हेगारी विश्व, गँगस्टर आणि अॅक्शनपट या प्रकारांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुंबईच्या अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.
‘जंग’, ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘झिंदा’, ‘शूटआउट अॅट वडाळा’ आणि ‘काबिल’ हे त्यांचे प्रमुख चित्रपट. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’मध्ये अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरला.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटाची निर्मिती आणि सहलेखनही गुप्ता यांनी केले होते. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय, अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्या भूमिका होत्या. मुंबईतील एका पोलीस चकमकीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.
स्टायलिश अॅक्शन दृश्ये, गुन्हेगारी कथानके आणि मुंबईतील अंडरवर्ल्डचे चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये होती. ‘द मिरांडा ब्रदर्स’ (२०२४) हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट ठरला. या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि मीजान जाफरी यांच्या भूमिका होत्या.
काही वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबईला जात असताना गुप्ता यांचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात त्यांना अनेक दुखापती झाल्या होत्या; मात्र त्यातून ते सावरले होते.
गुप्ता यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला. व्यावसायिक चित्रपटांना दिलेली वेगळी शैली आणि चित्रपटनिर्मितीविषयीची त्यांची निष्ठा यांची आठवण सहकाऱ्यांनी जागवली.






