सिनेनामा 

IFFI 2026 साठी गोवा सज्ज : ​​मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी : ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) कर्टन रेझर पत्रकार परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) ताज सिदाद दे गोवा होरायझन येथे झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महोत्सवाच्या विस्तृत कार्यक्रमाचे अनावरण केले. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या या महोत्सवासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

इफ्फीशी गोव्याचे असलेले नाते अभिमानास्पद असून हा महोत्सव राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि वार्षिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग बनला आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले. जागतिक चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपटप्रेमींचे स्वागत करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट प्रदर्शनाची ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, पाहुण्यांचे आतिथ्य आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित तयारीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये गोवा जगभरातील कथाकार आणि चित्रपटकर्मींना एकत्र आणणारे केंद्र बनते, असेही त्यांनी नमूद केले.

यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अशी आहे. चित्रपट हे भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविध देशांतील लोकांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले आहे. यंदाच्या इफ्फीमध्ये ८६ देशांतील १५९ चित्रपट दाखवले जाणार असून, त्यासाठी १३७ देशांमधून सुमारे १,९०० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्याची माहिती महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी दिली. प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांशी त्यांच्या परिचित अनुभवांच्या पलीकडे जाऊन कसा संवाद साधू शकतो, या विचारातून यंदाच्या महोत्सवातील चित्रपटांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी इफ्फी हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण, विविधांगी अभिव्यक्ती आणि सर्जनशील संवादाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘कथांना पत्ता असू शकतो; मात्र भावनांना सीमा नसतात’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा संदर्भ देत त्यांनी ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग यांनी महोत्सवाचा जागतिक विस्तार, विविध चित्रपटांचे सादरीकरण आणि बदलत्या काळानुसार विकसित होत असलेली इफ्फीची ओळख यावर प्रकाश टाकला.

या पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष कृष्ण कुमार, व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग, महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर, मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, फीचर फिल्म परीक्षक मंडळाचे अध्यक्ष मधुर भांडारकर, नॉन-फीचर फिल्म परीक्षक मंडळाचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मांडेकर आणि पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!