google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘फिल्म बाजार म्हणजे सर्जनशीलता आणि व्यापारी वृत्ती, संकल्पना आणि प्रेरणा यांचा अपूर्व संगम’

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या शुभारंभ दिनी आज गोव्यातील पणजी येथे आयोजित कार्यक्रमात   केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी  चित्रपट बाजार या सर्वात मोठ्या दक्षिण आशियाई चित्रपट बाजाराचे उद्घाटन केले .

या प्रसंगी बोलताना अनुराग सिंह ठाकूर  म्हणाले की हा चित्रपट बाजार म्हणजे संकल्पनांची गजबजलेली बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील चित्रपट निर्माते, उत्पादक आणि कथाकार यांच्यासाठी हा बाजार म्हणजे स्वर्गासमान आहे. हा चित्रपट बाजार म्हणजे या जोमाने बहरणाऱ्या चित्रपट बाजारपेठेच्या घडणीचे घटक असलेल्या सर्जनशीलता आणि व्यापारी वृत्ती, संकल्पना आणि प्रेरणा या तत्वांचा अपूर्व संगम आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की वार्षिक 20. टक्के विकासदरासह भारतीय माध्यमे आणि मनोरंजन उद्योग जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक जागतिकीकरण झालेला उद्योग म्हणून नावाजला जात आहे.चित्रपट बाजार या उपक्रमाचे हे 17 वे वर्ष असून हा बाजार म्हणजे इफ्फी महोत्सवाची अविभाज्य कोनशीला झाली असून यातून देशांच्या सीमा ओलांडून हा उपक्रम आशियातील सर्वात मोठ्या चित्रपट बाजारपेठेच्या स्वरुपात उत्क्रांत पावत आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

चित्रपट बाजारात प्रदर्शित करण्यासाठी निवड झालेल्या चित्रपटांतून काल्पनिक कथा, माहितीपट वजा लघुकथा, माहितीपट, भयकथा आणि अगदी अॅनिमेटेड चित्रपट यांचे वैविध्यपूर्ण मिश्रण दिसून येत आहे. या चित्रपटांचे विषय विविध समुदाय, पितृसत्ताक पद्धती, शहरी भागातील अस्वस्थता, टोकाचे दारिद्रय, हवामानाशी संबंधित संकटे, राष्ट्रीयत्व, क्रीडा तसेच तंदुरुस्ती यांसारख्या सार्वत्रिक संकल्पनांवर आधारित आहेत.

सह-निर्मिती बाजाराबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्ही सह-निर्मिती बाजार विभागात 7 देशांतील 17 वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या 12 माहितीपट अत्यंत अभिमानाने सादर करत आहोत. चित्रपट निर्मात्यांच्या नजरेतून सत्याच्या हृदयापर्यंतचा हा प्रवास असेल.”

व्ह्यूईंग रुम नामक व्हिडिओ संग्रहालय मंचावरील सादरीकरणासाठी 190 प्रवेशिका आल्या असून चित्रपट बाजार शिफारस (एफबीआर) साठी त्यातील काही चित्रपट निवडले जातील अशी माहिती देखील त्यांनी दिली. “वर्क-इन-प्रोग्रेस प्रयोगशाळेमध्ये चित्रपट निर्माते त्यांच्या कामाचे खरेखुरे सौंदर्य दाखवून देतात. या उपक्रमातील प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट करत यंदा 10 प्रकल्प सादरीकरणासाठी सज्ज आहेत,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

केन्द्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी असेही जाहीर केले की, नवोन्मेषाचा पुरस्कार, आणि पंतप्रधानांचे व्यवसाय सुलभतेचे आवाहन, याला अनुसरून “बुक टू बॉक्स ऑफिस” हा एक नवीन आकर्षक उपक्रम सुरु करण्यात आला असून, यामध्ये पुस्तकांमधून थेट चित्रपटांच्या पडद्यावर झेप घेणाऱ्या 59 सादरीकरणांचे प्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिंदी गुगल कला आणि संस्कृती प्रदर्शनाचे उद्घाटन केले, जे हिंदी चित्रपटांच्या प्रतिमा आणि लघु चित्रफितींचे ऑनलाइन केंद्र आहे.

54 व्या इफ्फी मधील ‘फिल्म बझार’ मध्ये शिफारस करण्यात आलेले माहितीपट, भयपट, हवामान बदलाची समस्या, काल्पनिक कथा, यासारख्या विषयांवरचे विविध शैलीतील 10 चित्रपट प्रदर्शित केले जातील. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंडची भाषा) या भाषांमध्ये आहेत. या वर्षीच्या, फिल्म बझारमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले “VFX आणि टेक पॅव्हेलियन” आहे. चित्रपट निर्मात्यांना नवोन्मेषाची जाणीव करून देणे, तसेच केवळ “शॉट घेण्याच्या” पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर “शॉट निर्माण करून’ गोष्ट सांगण्याची शक्यता आजमावण्याची संधी देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

फिल्म बझारमध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, यूएसए, यूके, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, पोलंड, लक्झेंबर्ग आणि इस्रायलमधील सह-निर्मिती बाजाराने अधिकृतपणे निवड केलेल्या पूर्ण लांबीच्या चित्रपट प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाते. ओपन पीच (खुला मंच) मध्ये, निवडक चित्रपट निर्माते आंतरराष्ट्रीय आणि भारतीय निर्माते, वितरक, महोत्सवाचे आयोजक, अर्थ पुरवठादार आणि विक्री एजंट यांच्यापुढे आपले प्रकल्प सादर करतील.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) सुरु केलेला फिल्म बझार, दक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या चित्रपट बाजारपेठेमध्ये विकसित झाला असून, तो स्थानिक चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट निर्माते आणि वितरकांशी जोडत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!