‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शिवरायांवरील पहिला बहुभाषिक सिनेमा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांनी नेहमीच ‘स्वराज्य’ची शिकवण दिली आहे. पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक. छत्रपती शिवाजी महाराज जगभरातील महान योद्ध्यांपैकी एक आहेत. शौर्य, त्याग, मैत्री आणि अतूट संयमाची अशी कथा समोर आणणाऱ्या ‘हर हर महादेव’च्या निर्मात्यांनी अखेर आपल्या पहिल्या बहुभाषिक मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
येत्या 25 ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे. विविध भाषेत प्रदर्शित होणार हा पहिला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट सत्य ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी शौर्य, त्याग, मैत्री आणि अतूट संयमाची गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला शौर्य-साहस आणि स्वराज्याचं शिक्षण देण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हर हर महादेव’ या युद्धाच्या घोषणेने आणि मराठा साम्राज्याचा पाया रचण्याच्या निष्ठेतून सर्वांना कसे एकत्र केले हे या कथेतून सांगितले जाईल. तसेंच, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आजच्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं आहे. या बहुभाषिक रिलीजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.
झी स्टुडिओज निर्मित, अभिजित शिरीष देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित, सुनील फडतरे सह-निर्मित, हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.