‘2025 पर्यंत साकारणार ‘इफ्फी’ भवन’
पणजी :
देश-विदेशातील सिनेकर्मींना गोव्याने नेहमीच सिनेनिर्मितीसाठी आकर्षित केले आहे. मुंबईनंतर देशाातील सर्वाधिक सिनेशूटिंग गोव्यामध्ये होत आहेत. नजिकच्या भविष्यात गोव्यातील या सिनेशूटिंगची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून सिनेनिर्मितीपश्चात कामासाठीही सिनेकर्मींनी गोव्यात यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोव्याला देशाचा सिनेहब करतानाच दिवगंत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाहिलेले ‘इफ्फी’भवनचे स्वप्नदेखील लवकरच पूर्ण करत 2025 सालापासून ‘इफ्फी’ स्वत:च्या हक्काच्या ठिकाणी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या 53 व्या इफ्फी म्हणजेच देशाच्या अधिकृत जागतिक सिनेमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि गोव्याच्या एन्टरटेरमेंट सोसायटीने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी जगभरातील, 79 देशातील 280 सिनेमे इफ्फीमध्ये दाखवले जाणार आहेत.
यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री बी. एल. मुरुगन, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, वाणी त्रिपाठी, ए. के. बीर, राज्य सचिव पुनित गोयल आदींसह अभिनेते परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी, वरूण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन आदी कलाकारदेखील उपस्थित होते.
या वर्षी गोवन विभाग देखील विशेष तयार करण्यात आला आहे. यासाठी इंडियन पॅनोरमाच्या निवड समितीच्या तीन सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष निवड समितीने सहा लघुपट आणि एक माहितीपट निवडला आहे. फेस्टिवल माईल, एनटरटेनमेंट झोन आणि हेरिटेज परेड यांसारख्या बहुविविध उपक्रमांद्वारे आम्ही पर्यटकांचे आणि गोव्यातील जनतेचे लक्ष वेधण्यात यशस्वी झालो आहोत.
– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल पटकथालेखक बी. विजेंद्रप्रसाद, अभिनेते परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटन समारंभानंतर देशभरातील प्रसिध्द कलारांचा समावेश असलेल्या विविध मनोरंजन कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अपार शक्ती खुराणा आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांनी केले.
कार्लोस सोरा यांना जीवनगौरव प्रदान
स्पेन मधील प्रसिध्द छायादिग्दर्शक तथा सिनेदिग्दर्शक कार्लोस सोरा यांना यावर्षीचा सत्यजीत राय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 93 वर्षीय कार्लोस सोरा यांना प्रत्यक्ष गोव्यामध्ये येता आले नाही, त्यामुळे त्यांच्यावतीने त्यांची कन्या अॅना सोरा यांनी हा पुरस्कार अनुराग ठाकूर, डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वीकारला.
‘देशाला 75 वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देश विविध क्षेत्रामध्ये प्रगती करतानाच आपले नेतृत्व प्रस्थापित करत आहे. अशावेळी देशाच्या शतकमहोत्सवी वर्षांमध्ये भारत हा जगातील सिनेमाचे केंद्रस्थान बनून ‘सिनेविश्वगुरु’ व्हावा, अशी इच्छा असून, माझे खाते त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
– अनुराग ठाकूर,
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री.
गोव्यात लवकरच ‘फिल्मस्कूल’
राज्यात सिनेसंस्कृती मोठ्याप्रमाणात जोपासली जात असून, इफ्फीमध्ये दरवर्षी गोंयकारांचा वाढता सहभाग हे याचेच द्योतक आहे. त्यामुळे उभरत्या लेखकांना, दिग्दर्शकांना, कलाकारांना मार्गदर्शन देण्यासाठी तसेच सिनेक्षेत्रातील विविध विधा शिकवण्यासाठी राज्यामध्ये लवकरच ‘फिल्मस्कूल’देखील सुरु करण्यावर विचार होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मेगास्टार चिरंजीवी ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ :
यावेळी प्रसिध्द तेलुगू – हिंदी अभिनेते ‘मेगास्टार’ चिरंजीवी यांना यावर्षीचा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार वहिदा रहमान, रजनीकांत, इलैयाराजा, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, अमिताभ बच्चन, सलीम खान, बिस्वजित चॅटर्जी, हेमा मालिनी आणि प्रसून जोशी आदींना प्रदान करण्यात आला आहे.