
IFFI 2026: १३ नोव्हेंबरला पणजीत होणार इफ्फिचा ‘कर्टन रेझर’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटनपूर्व कार्यक्रम
पणजीजवळील दोना पावला येथील ताज सिदादे द गोवा होरायझन येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री तथा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी)चे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कर्टन रेझर कार्यक्रमात ५७ व्या इफ्फीची प्रमुख वैशिष्ट्ये, विशेष उपक्रम आणि महोत्सवाच्या आयोजनासंदर्भातील तयारीचा आढावा सादर करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच चित्रपटप्रेमींसाठी हा महोत्सव महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा उत्सव, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि जागतिक चित्रपट संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कर्टन रेझर कार्यक्रमातून इफ्फीच्या अधिकृत उलटगणनेलाही सुरुवात होणार आहे.
चित्रपट, संस्कृती आणि जागतिक सर्जनशील देवाणघेवाणीचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून गोव्याची ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ५७ वा इफ्फी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या तयारीची झलक आणि आगामी उपक्रमांची माहिती या कार्यक्रमातून दिली जाणार आहे.



