IFFI 53 : कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
यंदाच्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज दिली.
चित्रपट विश्वातील दिग्गजांना एका छत्राखाली आणणाऱ्या, कला, चित्रपट आणि संस्कृतीचे वातावरण निर्माण करून या विश्वात मोठी उर्जा निर्माण करणाऱ्या या महोत्सवाचे गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात आयोजन करण्यात येणार आहे. 53व्या इफ्फीची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे संचालक आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. यंदा या महोत्सवात 79 देशांचे 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा मध्ये 25 भारतीय फीचर फिल्म आणि 20 बिगर फीचर फिल्म दाखवल्या जातील, तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग असतील. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी देखील या संदर्भात इतर माहिती दिली.
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डेप्रिसा डेप्रिसा साठी गोल्डन बेअर, त्याचबरोबर ला काझा आणि पेपरमिंट फ्रापे साठी दोन सिल्वर बेअर्स, कार्मेन साठी बाफ्टा आणि कान महोत्सवात तीन पुरस्कार आणि इतर बरेच सन्मान मिळवणारे स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि इफ्फीमध्ये आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.