
‘उरमोडी प्रकल्पाची तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करा’
सातारा (महेश पवार) :
उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील उजव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम, पाणी वितरण व्यवस्था, उपसा सिंचन योजना आदी कामे अजून पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे सातारा तालुक्यातील शेतकरी उरमोडीच्या पाण्यापासून वंचित आहे. उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांना केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. धुमाळ यांनी दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी सातारा तालुक्याच्या सिंचन प्रश्नाच्या अनुषंगाने पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंचन आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे आणि सातारा पाटबंधारे मंडळाचे संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत उरमोडी प्रकल्पांतर्गत उरमोडी उजवा कालव्याचे कि.मी. १, ३ ते ५ चे तसेच कि.मी. ६ ते १० चे अस्तरीकरणाचे काम त्वरित चालू करणे. उरमोडी उजवा कालव्याचे काम वितरण व्यवस्थेसह मे २०२३ अखेर पूर्ण करणे. उरमोडी जलाशयातील उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करणे या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सातारा तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी हि सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा खोरे आणि पाटबंधारे विभागाने त्वरित कामे सुरु करून मे २०२३ पर्यंत पूर्ण करावीत, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. याबाबत डॉ. धुमाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित कार्यवाही केली जाईल असे सांगितले. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यामुळे लवकरच हि सर्व कामे सुरु होऊन पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.