google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

मुंबई:

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ नेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली.

अनेक कलाकार घडवण्याचं कामही त्यांनी केलं. शेवटच्या क्षणापर्यंत ते रंगभूमीवर काम करण्यासाठी सक्रिय होते. त्यांना अनेक कलाकार अण्णा म्हणून हाक मारत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समांतर या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारीत वेब सीरिजमध्ये त्यांनी ज्योतिष्याची भूमिका केली होती. पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर आधारीत त्याच शीर्षकाच्या नाटकात त्यांनी अंतू बर्वा ही भूमिका साकारली होती. ती भूमिका लोकांच्या आजही स्मरणात आहे.


मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मधला. त्यांचं मूळ गाव गुहागर हे होतं. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता. त्याच्याकडे जयंत सावरकर आले आणि गिरगावातच त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ होतं. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं. हौशी नाट्य संस्थांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित किंग लिअर या नाटकात मास्टर दत्ताराम यांच्यासह जयंत सावरकर यांना काम कऱण्याची संधी मिळाली. हे नाटक फार चाललं नाही मात्र जयंत सावरकर यांनी केलेली विदुषकाची भूमिका चांगलीच गाजली.


१०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे. जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. ९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भुषवलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!