google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘हे म्हणजे सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब’

पणजी :
गोव्यातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून कॉंग्रेस आमदारांना  तोंड देण्याची हिंमत त्यांच्यात नाही. सरकारला विविध घोटाळे आणि कारनामे  उघडकीस येण्याची चिंता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपले अपयश उघड होण्यापासून सुटकेचा मार्ग शोधला आहे. विधानसभेचे अधिवेशन खंडित करणे हे भाजप सरकारच्या अपयशाचे शिक्कामोर्तब आहे असा घणाघात कॉंग्रेसचे विधीमंडळ गट उपनेते संकल्प आमोणकर आणि कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी आज येथे जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकातुन केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रसार माध्यमांना सामोरे जाण्याची हिंमत नाही. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये काँग्रेस आमदारांचा सामना करण्याचे धैर्य नाही. आम्ही १० दिवशीय अधिवेशनात सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करू, असे संकल्प आमोणकर म्हणाले.

पंचायत निवडणुकांचे कारण सांगून घाबरलेल्या सरकारने डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश उघड होण्यापासून सुटकेचा मार्ग पत्करला आहे. आम्ही गोव्याच्या लोकांचा आवाज बनून राहू. सरकारला वेठीस धरण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनातील प्रत्येक संधीचा फायदा आम्ही घेणार व योग्य रणनितीने सरकारला घेरणार असे युरी आलेमाव म्हणाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावादरम्यान सरकारच्या उणिवा आणि अपयश दाखविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आम्ही आर्थिक गैरव्यवस्थापन  समोर आणू. विविध विभागांच्या मागण्यांवर बोलताना आमचे आमदार मतदारसंघ केंद्रित मुद्दे घेतील, अशी माहिती दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली.

तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्याची आणि शांततापूर्ण आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची मागणी करणारा आमचे केपेचे  आमदार ॲल्टन  डिकोस्ता यांचा खाजगी सदस्य ठरावावरील चर्चेत गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी कोण बांधील आहे हे जाणून घेण्याची संधी गोमंतकीयांना मिळणार आहे. सदर ठरावाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे असे कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.

गोव्याची ओळख, पर्यावरण आणि वारसा जतन करण्यासाठी आम्ही शुन्य प्रहर,  लक्षवेधी सुचना तसेच उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा वापर करून सरकारकडुन ठोस आश्वासन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे संकल्प आमोणकर आणि युरी आलेमाव  म्हणाले. आम्ही राज्याशी संबंधित समस्या जाणुन घेण्यासाठी  विविध तज्ञ आणि भागधारकांशी सल्लामसलत करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!