‘विद्या प्रबोधिनी’त ‘गोमंत गातो गीत रामायण’
पणजी :
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनःप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला विद्या प्रबोधिनी महाविद्यालयातर्फे पर्वरी येथे गोमंत गातो गीत रामायण हा ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी निर्मिलेल्या गीत रामायणावर आधारित गीत, नृत्य आणि नाट्य कार्यक्रम रविवार २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या क्रीडागण परिसरात आयोजित केला आहे.
गीत रामायण हा ५६ गाण्यांचा संच पहिल्यांदा १९५५ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाला होता. विशेष म्हणजे ह्याची संकल्पना आपल्या डोंगरी गावचे सुपुत्र सीताकांत लाड याची आहे. नियोजित कार्यक्रमात निवडक २८ गाण्यावर गोमंतकीय कलाकार सादरीकरण करतील. सुरुवातीला सामूहिक राम रक्षा स्तोत्र पठन होईल, नंतर कलाकारांचा मान्यवरांतर्फे सन्मान केला जाईल.
गोमंतकातील कलाकार ज्यांनी गीतरामायणाचे गोव्यात बरीच वर्षे गायन, वादन, सूत्रसंचालन केलेले आहेत आणि या कार्यक्रमात भाग घेऊ इच्छितात त्यांनी डॉ. अरुण मराठे यांच्याशी ८७८८४०७८३० या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, त्यामुळे सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी अशी विनंती महाविद्यालय व्यवस्थापनाने केली आहे.