google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

पंखातली ऊब वा दुभंग कविता

– डॉ. सुधीर रा. देवरे

‘डंख व्यालेलं अवकाश’ हा माझा पहिला मराठी कवितासंग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने लाखे प्रकाशन, नागपूर यांनी १९९९ मध्ये (परस्पर) प्रकाशित केला होता. यात १९८९ ते १९९२ या चार वर्षांतील कविता समाविष्ट होत्या.

‘आदिम तालनं संगीत’ हा अहिराणी कवितासंग्रह भाषा प्रकाशन केंद्र, बडोदा (डॉ. गणेश देवी) यांनी २००० साली प्रकाशित केला. मात्र १९८० ते आतापर्यंतच्या माझ्या सर्व मराठी कविता, संग्रह रुपाने प्रकाशित झाल्या नव्हत्या. कविता सुचल्या की लिहून तशाच पडून होत्या. नियतकालिकांकडे प्रकाशित करायलाही अनुत्सुक असायचो. शेवटी अशा निवडक (जवळपास तीनशे- साडेतीनशे) कविता एकत्र करुन ‘फुटूच लागतात पंख’ आणि ‘भंग अभंग’ असे दोन कवितासंग्रह आकारास आले. आणि ते आता (२०२२ ला) प्रकाशित झाले. (कवितांच्या वर्गीकरणानुसार दोन कवितासंग्रह झाले. अन्यथा एकच राहिला असता.)


माझ्या आत्मनिष्ठ जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार, असा माझ्यापुरता निकष तयार करून वयाच्या सतराव्या वर्षापासूनच्या (१९८०) ते आजपर्यंतच्या (२०२१) अशा ४० – ४१ वर्षांतील निवडक कवितांचे संग्रह म्हणजे ‘फुटूच लागतात पंख…’ आणि ‘भंग अभंग’. या पंखांत- शब्दांत कलाविष्कार असतील तर ते स्वबळाने उद्या आकाशात विहार करतील- अभंग राहतील, अन्यथा निसर्गाच्या नियमाप्रमाणे फुटलेले पंख केव्हातरी गळून पडणारच, या स्थितीचे भान पंखांना उपजतच आहे. माझ्यासारख्याने ‘अभंग’ नावाने लिहिलेल्या कविता काळाच्या कसोटीवर भंगून कधीनाकधी नामशेष होणारच, असे गृहीत धरून त्याचे सोयरसुतक पाळण्याचे- त्याची काळजी करण्याचे कवीला काहीही कारण उरत नाही.

‘आदिम तालनं संगीत’ हा अहिराणी कवितासंग्रह तर ‘डंख व्यालेलं अवकाश’, ‘फुटूच लागतात पंख’, ‘भंग अभंग’ (हे तीन मराठी) अशा आतापर्यंतच्या आयुष्यभराच्या माझ्या कविता या चार संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. या पुढे माझे कवितासंग्रह प्रकाशित होतील असे मलाच वाटत नाही.

या कवितांना प्रकाशित करण्याची मला कधीच घाई नव्हती. या मंचीय कविता नाहीत. (म्हणून ‘व्वा व्वा, क्या बात है’ वगैरे उत्स्फूर्त दादची अपेक्षा कधी केली नाही.) माझी कविता क्रांतिकारी, प्रायोगिक, बंडखोर, नवीन प्रवाह निर्माण करणारी, अमूक एका गटातली म्हणजे कवितेतल्या एखाद्या संप्रदायातली वगैरेही स्वत: समजत नाही. कोणाच्या प्रभावातून कवितेकडे वळलो नाही. ही कविता स्पर्धेसाठी नाही म्हणजेच पारितोषिकांसाठीही नाही. कविता मला आतून मनचावळसारख्या सुचायच्या म्हणून त्या लिहिल्या. या कविता आधी माझ्यासाठी आहेत. त्यात सामुहिक भान असेलही कदाचित पण आधी माझ्या व्यक्तिगत प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहेत. जीवनवादी आहेत की नाहीत, कलात्मक आहेत की नाहीत, मुळात त्या कविता आहेत की नाहीत, मला माहीत नाही. पण अं‍तरिक गरज असल्याने त्या त्या वेळचा आविष्कार म्हणून लिहून ठेवल्या आहेत. कदाचित या कविता म्हणजे माझे त्या त्या वेळचे चिंतन वा भाष्य असावे. म्हणून बळजबरी कवितांची लांबी रूंदी नंतर वाढवली नाही.


दोन्ही संग्रहातली एकेक कविता इथे सहज देत आहे. (या निवडीमागेही कोणतेही विशिष्ट कारण नाही. हाती लागल्या त्या कविता दिल्या आहेत.)

कोळी किडा

कोळी मटकावू शकत नाही वाघ आणि सिंह म्हणून आपल्या भोवताली जाळं विणून किडा खात बसतो मच्‍छर आणि माशा.

कोळी आख्या आसमंतातल्या देवांना करत असतो आवाहन वाघ सिंह हरणं बकऱ्या हत्ती माणसासहीत.. प्राणी व्हावेत अनुक्रमे नसली तरी मच्‍छर माशा डास गोमाशा पाकळ्या पतंग जे सहज जाळ्यात अडकून मटकावता येतील घशात.

सोयीचा वारा सुटला की कोळी म्हणतो ‘माझ्यामुळेच’
जाळीत अडकताच किटकाला आधी उपदेशतो ‘माझ्या कारणे देह तुझा का पडावा’चं तत्वज्ञान
आणि सावकाश गलितगात्र मटकवताना पटवून देतो
‘माझ्यामुळंच तुला आता मोक्षाचं दार!’
(फुटूच लागतात पंख)

आदिवासी कवी

वेद जरी कोणी ।
रचले ऋषींनी ।
अध्यात्माचा पाढा ।
मुनी गातो ।।

आदी रहिवासी ।
रानात वसति ।
वेदनेचा कवी ।
गीत गातो ।।

वा‍ल्मीकी असो की ।
असो कोणी व्यास ।
आदिवासी कवी ।
मुळातला ।।
(भंग अभंग)


अशा प्रकारची समग्र अवस्था म्हणजे माझ्या अशक्त पंखातली उब अथवा दुभंग अवस्थेतली कविता असेही म्हणता येईल.
संशोधन, समीक्षा, भाषा, कला, लोकजीवन, लोकवाड्‍.मय, लोकसंस्कृती, आदिवासी लोकसंचितासोबत कथा- कादंबरी आदी ललित आणि वैचारिक लेखनातही त्या त्या वेळी त्या त्या आविष्कारांची आतून मागणी होती म्हणून त्या त्या क्षेत्रात लिखाण झाले- होत आहे. मात्र कविता लहानपणापासून- अगदी पाचवीत असल्यापासून सोबतीला होती. माझा पहिला आविष्कार कविताच होती. तिच्या सावलीतच आख्खी ऊर्जा मिळवत आलो.


द. ग. गोडसे, विलास सारंग, पुरूषोत्तम आत्माराम चित्रे, दिलीप पुरूषोत्तम चित्रे, कमल देसाई, सतीश काळसेकर, कुसुमाग्रज, सी. श्री. उपाध्ये, डॉ. म. सु. पाटील, म. द. हातकणंगलेकर, डॉ. अशोक रा. केळकर, रा. ग. जाधव, डॉ. गणेश देवी, पुरुषोत्तम पाटील, द. भा. धामणस्कर, डॉ. रमेश वरखेडे, विश्वनाथ खैरे, डॉ. अश्विनी धोंगडे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, सीताराम गिरप, डॉ. किशोर सानप, डॉ. अरूण प्रभुणे, निरंजन उजगरे, डॉ. शशिकान्त लोखंडे, सुनंदा भोसेकर, मनोहर सोनवणे आदी सुह्‍दांसह अभिरुची, अक्षर चळवळ, अनुष्टुभ्, उगवाई, संवाद, कविता-रती, ब्र, शब्दालय, हंस, प्राजक्‍त, सावाना, रुची, ललित, भाषा आणि जीवन, लिखाण, तुका म्हणे, महाअनुभव, ओवी, परिवर्तनाचा वाटसरु, स्त्री, किर्लोस्कर, आरती, आपले वाड्‍.मय वृत्त, सकाळ, गावकरी, देशदूत, रामभूमी, भाषा केंद्र बडोदा आदी व्यक्ती, नियतकालिके व संस्थांनी या कवितेची दखल घेतली आहे.


सुविख्यात समीक्षक डॉ. किशोर सानप आणि मनोहर सोनवणे यांनी ‘भंग अभंग’ला तर डॉ. शशिकान्त लोखंडे यांनी ‘फुटूच लागतात पंख’ या संग्रहांना परिश्रमाने अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या. कवी निरंजन उजगरे यांचे यापैकी काही कवितांविषयीचे (‘फुटूच…’) विवेचन संग्रहाच्या शेवटी परिशिष्टात छापले आहे. हे विवेचन त्यांनी १९-०७-२००२ या तारखेला लिहून पूर्ण केले आणि मला पाठवले. (त्यामुळे त्यांच्या अभिप्रायात २००१ पर्यंतच्या कवितांवरच विवेचन आले आहे.) या नंतर काही दिवसांनी ते दुर्दैवाने स्वर्गवासी झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अजूनही माझा विश्वास बसत नाही अशी ही घटना अनपेक्षीत घडली.

कवी मित्र व चित्रकार खलील मोमीन यांनी ‘फुटूच लागतात पंख’साठी तर धनंजय गोवर्धने यांनी ‘भंग अभंग’ला आनंदाने मुखचित्रे दिली. दोन्ही पुस्तकांच्या सुबक आणि सुंदर निर्मितीसाठी गोव्याचे किशोर अर्जुन, सागर शिंदे, सहित प्रकाशन यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

(शेवटी जाता जाता ताज्या कलमात गमतीनं घेतलंय म्हणून सांगतो, येणार्‍या प्रतिक्रियांमध्ये या दोन्ही संग्रहातल्या कवितेची कोणी तुकारामांशी, कोणी मर्ढेकरांशी, कोणी चित्र्यांशी तुलना करताहेत. पण ‘हरभर्‍याच्या झाडावर’ चढणार नाही की ‘नंदनवनात’ रमणार नाही.)

http://sudhirdeore29.blogspot.com/

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!