कसदार कवितांचं सत्व आणि स्वत्व
- डॉ. शशिकान्त लोखंडे
‘फुटूच लागतात पंख…’ हा डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. त्यात १९८० ते २०२० पर्यंतच्या चाळीस वर्षांतील निवडक कवितांचा समावेश आहे. विविध अनुभूतींची, भावस्थितींची अनेकविध रूपं घेऊन त्यांची कविता साकार झाली आहे.
कविता अव्याख्याय असली तरी ती एक प्रतिमा म्हणून जिवंत राहते. ह्या जिवंततेतील स्पंदनं म्हणजे कवितेचा भावार्थ होय. “Genuine Poetry can communicated before it is understood” (T.S. Eliot, Dante) ह्या अर्थी कवी देवरे यांच्या या कविताकडं मला पाहता येतं. म्हणून मी इथं समग्र कवितांचं समीक्षण करत नाही. प्रस्तावना ही समीक्षा असावी हा मला न पटणारा विचार आहे. समीक्षा ही मूल्यांचा निर्देश करते तर प्रस्तावना या मूल्यांच्या परिसराची अनुभूती संवेद्यपणं देते. म्हणून मी इथं विस्तारानं कवितांच्या रंगरुपात आणि रुपरंगात रमतो आहे. माणसातही रूपशील असण्याचा स्वभाव असतो. अस्वस्थतेतून कविता जन्मते या भाकीतावर माझा विश्वास नाही. कारण अशी अस्वस्थता डॉ. देवरे यांच्या कवितेत नाही. उलट काळजी, भय ह्या पासून मुक्त होऊन विश्रांतावस्थेतील ह्या कविता आहेत. म्हणून त्यांची रूपशैली चैतन्याविष्कारी आहे. स्वभवतालचं बरं-वाईट विश्व जाणण्याच्या अविकारी उर्मीतून ह्या कविता प्रवृत्तीरूप घडल्या आहेत. Transguillity (नि:शब्दता) मुळेच “Pure Poetry, somting that the poet creats outside of his own personaliry” (George Moore, Introduction to Anthology of pure poetry). कवितेला प्रवृत्तीरूपता येते. ‘अस्वस्थता’ कधीच कलारूप घडवू शकत नाही. कारण कविता हे काही कवीचं खाजगीपण नसतं. खाजगीपण आस्वाद्यमान (Universal) होईलच कसं? सामाजिक कसं होईल?
‘सामाजिक कविता’ ही संकल्पना व्याघाती आहे. कवितांची वर्गीकरणं सोयीची बाब असली तरी त्यातून येणाऱ्या काव्यानुभूतीला कोणताही विशिष्ट वर्ग नाही. म्हणून तर प्रेम कविता, शोकगीतं हे ही सामाजिकच. कवितेतला ‘समाज’ आणि कविते‘बाहेरचा समाज’ ह्यात कार्यकारणभाव असावाच अशी अट कवीला नाही. कवितेतला समाज शब्दांपलीकडला आहे. आजच्या विज्ञानाचा अतिरेक करणारा समाज कवीला माणूस हरवल्याची जाणीव देतो.
‘अरे तुमच्या घरातला
माणूस दिसत नाही!
गेला कुठं!’
कारण – ‘सगळं जग वितीएवढ्या खिडकीतून घरात भसा भसा उतू जातंय…’ टीव्ही, टेप, कॅसिओ, रेडिओ, फ्रिज, मोबाईल, वाशिंग मशीन, फर्निचर, कॅल्क्युलेटर, टेलिफोन, कॉम्प्युटर, नेट, वायफाय, व्हॉटस अप सारं भोवती असूनही माणूस माणसातून हरवलाय असा समाज कवी देवरेंच्या कवितेत आहे. माणसाला फेसबुक असूनही स्वतःचा फेस नाही, ही कवीची वेदना आहे.
‘माणसाला माणूस म्हटलं
तर स्तुती नाही.
आपण नेमकं उलटं करतो,
माणसाला माती
आणि दगडाला
देव्हारा देतो…’
असं कवीची विश्रब्ध मानसिकताच पाहू शकते. तथापि कवितेची गुणवत्ता त्यातील आकृतीबंधाच्या विशिष्ट तऱ्हेच्या सामाजिक महत्तेवर अवलंबून आहे, असे आज नवोदोत्तरी कवितेच्या नव्या समीक्षकांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं मोठंपण किवा चांगूलपण ही काही नैतिक- अनैतिक बाब नव्हे, तर काव्य घटकावयवांची जिवंत एकात्मता म्हणजे सेंद्रिय एकात्मता तिची महात्मता ठरवतात. त्याकडे शैलीबाज समीक्षकांचं आज दुर्लक्ष आहे.
कवी माणूस कोणत्या जैविक स्तरातून, कोणत्या पर्यावरणवादी, कौटुंबिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरणातून येतो त्यावर त्याची काव्यविषयक समज अवलंबून राहते. तरीही बहिणाबाई चौधरी अहिराणीत लोकगीतं लिहित म्हणून कवी देवरे आजही अशी लोकगीतं कसे लिहितील? (‘आदिम तालनं संगीत’ ह्या त्यांच्या अहिराणी भाषेतील कविताही आधुनिकच आहेत.) कवीला आपली ‘व्यक्तिगतता’, ‘मी’ रहीतपणे सोडावी लागते. कारण काव्यानुभवाची सार्वत्रिकता कवितेची महत्तत्ता ठरते.
‘देहांच्या घुसळीतून अमृत
निघता निघत नाही,
तुंबलेल्या गाळातून
कमळ फुलता फुलत नाही
– वेळ जात नाही म्हणून
आपण संस्कृतीच्या गप्पा मारु!’
…….
असा सार्वत्रिक ढोंगांचा अनुभव, कवीच्या अनुभवाचा विषय होतो. त्यातील व्यक्तिगतता ‘मी’रहीत होऊन जाते. ही रुपशीलताच आहे.
ही रुपशीलता डॉ. सुधीर देवरे यांची खरी कविता आहे. भोवतालच्या पसाऱ्यावर ती आतून क्रिया करते. ही क्रियाही आतल्या एका वैशिष्ट्यपूर्ण, अनुभवपूर्ण आणि स्वतंत्र अशा भावावस्थेतून निर्माण झालेली आहे. देवरे जो अनुभव घेतात तो लक्ष दिल्याशिवाय रसिकशक्तीला उलगडता येत नाही. उदा.
‘जाळीतून मासोळीला
फाटे लाल ओली वाट
वर ढगाळ आभाळ
खाली लाटेवर लाट
निळ्या पाण्यात तुटलं
निळं पिसाळ आभाळ
निळं निळं निवळून
निळा पन्हाळ घायाळ.’
‘बंगल्याच्या भिंतीवर
एक चित्र आहे:
:बंगला, कुंपण
आणि घोडे!
बस…
– बंगल्यात
माणसाचं चिन्हही
दिसत नाही!…’
‘‘A poem should not mean but be’’ (Archibald Macleish, Ars Poetica) अशी कवितेसंबंधीची माझी धारणा आहे. कविता आणि सामाजिक विरुपता यांच्यातील परस्पर अन्वय हा ज्ञानात्मक व्यवहार होतो असा माझा समज आहे. जे समाजात ‘आहे’ ते कवितेत कार्यकारणभावयुक्त असेल तर कवितेच्या ‘आकृतिबंधाची’ कवीला गरज का वाटावी? ही जटिलता आहे. जे समाजात आहे ते प्रतिबिंबवत कवितेत विषय- आशय होऊन आल्यास त्याकडे आकृतिबंधांदी कलामूल्यांच्या निकषानेच पाहायचं असतं. मर्ढेकरांनी तत्कालीन भीषण वास्तवाला निबंधाचं रूप येऊ दिलं नाही. त्यांनी प्रथम कवितेचं ‘कवितापण’ अबाधीत ठेवलं. तसं कार्य आजच्या प्रतिष्ठित नव्या कवींना तीळभरही जमलं नाही.
कविता हाच ‘एका काव्यानुभवाची प्रतिमा’ असते आणि ती प्रामुख्याने भाषात्म प्रकृती असते. शब्दशक्ती आणि अलंकार, शैलीविज्ञान ह्या माध्यमांचं मूर्तत्व म्हणजे कविता. काव्यानुभव हा व्यवहार्य ज्ञानानुभव नव्हे. ज्ञानात्मक – व्यवहारात्मक अनुभवापेक्षा काव्यानुभव हा सौंदर्यमूल्य भावच असतो. उदाहरणार्थ,
‘ती आरशात न्याहाळते
मुसमुसलेला देह…
आणि…
दिसतो तुमच्या घटृ
विळख्यातला दाह…
तिला कोणी दिसतच नाही
आरशात मूर्त
कोणत्याही बाह्य
साजसृंगारासह…
– ती स्वप्नात सांगते
आरशातल्या आरशात…
विरह!…’
ह्या कवितेचं भावसौंदर्य कोड्यासारखं उलगडून न दाखवण्यातच आहे.
कविता आणि सामाजिकता अशा अभिधानामधील परस्पर विरोधी गुणधर्मातील भेदाचा, संबंधाचा वेध कवी देवरे यांनी ‘देवाचा बाप’, ‘कुचक्या वासाच्या अमरधामात’, ‘सृजनाला नकार’, ‘प्लॅस्टिकच्या रोपांची सजावट’, ‘उंदीर कैलासवासी’- या कवितांतून घेतला आहे.
‘देवपण निभावता येतं,
माणसाला माणूसपण
निभावता येईलच
असं नाही…’
‘देवाचं सोंग घेऊन
भोवाडा गाजवता येतो
पण भर पेठेत
माणूसपण
वठवता येत नाही…’
‘काहींना आकार देवून
मिळालं देवपण
काही मात्र नुसत्याच
रंगहीन आकारहीन
शिळांत जीव शोधतो
जडांत देव कुठं कुठं!’
‘कोणी नमस्कार करावा
आणि मला –
खाटकाने बोकडाला
चारा टाकण्याची
आठवण व्हावी.’
इथं कवी मानवी जीवनाचं (जीवन वस्तुचं) विश्लेषण उपरोधातून करताना दिसतो. सामाजिकतेचं विज्ञान सांगता येणं सोपं नाही. काव्यानुभव हा साधा सुखसंवेदनकारक भावप्रत्यय असतो. भावप्रत्यय ही गरज संपणारी, नष्ट होणारी नाही, की तृप्त होताच ती संपून जावी. ही सम्यक भावस्थिती आहे. कवितेचा आशय गद्य रूपातून विश्लेषित केला, की ही भावस्थिती अम्लान राहात नाही. कविता ही कशाची तरी भावस्थिती असते. शरीरऊर्जा ही काही भावस्थिती नाही. कवी देवरे यांची भावस्थिती ही प्रज्ञा संस्कारित आहे. अल्पाक्षरत्व ही तिची अवस्था आहे. आपल्याला प्रत्यक्ष अस्तित्वातील वस्तूसंबंधी खूप काही माहीत असतं. पण काव्यानुभवात याची गरज नसते. म्हणून देवरे यांच्या ‘पावसावरील कविता’ विविध रूपशैलीची चमत्कृती देतात.
कवी भोवतालचं माणूस म्हणून आणि कवी म्हणून काही पहातो आणि त्यावर चिंतनात्मक भावगर्भ क्रिया करतो. त्यांना रुपांतरीत करतो. उदाहरणार्थ, शारदा, राजा इत्यादी.
‘शारदाने
हातातली वीणा उलटी धरुन
हवेत शस्त्रासारखी परजली…
अशा चित्रासह
अशा शारदेचीही प्रतिक्षा…’
पुरुषप्रधान संस्कृती साधारणीकरणानं स्त्रीमध्ये मातृत्वाचं न नाकारता येणाऱ्या बंधनांचा गौरवच करते. ही वेदनादायी सुरांची हाक असावी. ‘शारदा’ कवितेत नऊ तुकड्यात ‘स्त्री’चे विविध विभ्रम ‘अवस्था’ चित्रित होतात. इथं वीणावादीनी शारदा ही फक्त परंपरेतली मातृत्वशरण अबला रहात नाही. वीणेचं अस्त्र- शस्त्र करून पुरुषप्रधानतेला ठार करणारी सबला होऊ पहाते. म्हणून ही कविता केवळ बोधनाचा (Perception) प्रकार होत नाही. कवीची शारदेबद्दलची भावस्थिती सेंद्रियसंधान बनते. समूर्त बनते. मनस्थितीलाच इथं स्वतःचं मूर्तत्त्व येतं. प्र-रुपता येते. म्हणून ती व्यक्तिगत पातळी ओलांडून समष्टीत येते. पुरूषप्रधानतेतल्या दुःखाला कवी रूपांतरीत करतो, स्वअनुभूतीच्या स्वाधीन राहून, स्वमग्नतेतही कविता ‘सामाजिक’तेच्या पुढं जात वैश्विक होते.
न अनुभवताही कवीला जीवनानुभवाची संवेदना जाणवत असते. कवीचं ‘इंद्रिय’ भावस्थिती हे आहे. आकृतीबंधातून ते इंद्रियरूप घेते. जीवनानुभव म्हणजे आकृतीबंधातून प्रकट झालेली भावस्थिती होय. आकृतीबंध म्हणजे स्वतंत्र आशय नव्हे. वास्तव हे कवीला भासरूपच असतं, खरी वस्तू नसते. खरी वस्तू ‘ज्ञानविषय’ होऊ शकते. म्हणून वास्तव हे काही ‘ज्ञानविषय’ नव्हे. वास्तवात किती जिवंतपणा आहे आणि रचना कशी आहे, यावर वास्तवाचं आकलन अवलंबून असतं. वास्तव हे दृश्यरुपात, भासरूपात असू शकतं. ते खरंखुरं वास्तव नसतं, हे ही देवरे यांची कविता सांगते. कवीला ढग हा थंडगार वाफेचा पुंजका दिसतो, तसा ‘ढगाची भासमान संरचना’ सौंदर्याकृती म्हणूनही दिसते. ही कवी वर्णित अदभूत संरचना ‘ज्ञान’ आहे का? सुधीर देवरे यांच्या पावसावरील कविता वाचताना हे जाणवलं, की ढगाच्या वास्तवपणात कवीला ‘भावस्थिती’ची निकडही वाटली. वास्तवातही भावस्थिती फुलवणं हे कवीचं कार्य आहे. उदा. ‘ढगाळ पावसाच्या कविता’, ‘नवीन पडलेल्या थेंबाला’, ‘बीजं’ इत्यादी.
‘ढगानं सांडू नये पावसाला
खडकावर
आणि समुद्रावरही;
कोंब येऊ शकतील
अशा धरतीला
पाऊस हवा!’
संविधानातल्या निधर्मी राष्ट्रात, धर्म स्वातंत्र्याची मुभा असूनही, धर्मांध स्वार्थी धार्मिकांना (नागरिकांना) कोणता धर्म वाचवायचा आहे? तथाकथित संस्कार ही भंपक गोष्ट आहे, असं तिरकसपणं- वक्रोक्तीनं सांगत कवी ‘मानवी धर्मा’च्या बाजूनं उभा राहतो . ‘बाहेरचं कुपमंडूक वास्तव प्रक्षेपण’ पाहून संस्कारानं माणूस जगावा की निसर्गत: जगावा हे भयावह व्दंव्द कवीच्या मनात आहे. अशी ही उद्ध्वस्त धर्मशाळाच आहे..
कवी विधायक ‘मनुष्य धर्मा’तील असून त्याला स्त्रीच्या ‘अंगात सुटेबल कपडे’ आवडतात. पुरोगामित्व वा प्रतिगामित्व शोशिकपणात नाही, विचारात नाही, कृतीत नाही, ते मनोवस्थेचं निर्देशन आहे. धर्मांध ‘फतव्यां’चं निर्देशन पाहून कवी खंत व्यक्त करतो. स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणून पहावं असं कवीला वाटतं. शिक्षणाचा – विज्ञानाचा फायदा
घेणाऱ्या पण लोकांना अज्ञानाच्या अंधारात ढगलणाऱ्या ‘धर्मगुरू’चा भंपकपणा उपरोधानं उघडा करुन कवी ‘निवडीचं स्वातंत्र्य’ मान्य करतो.
‘कोणत्याही जत्रेत माणसांनी माणसांना चिरडत आपल्यासह माणसं मारावी हिंस्त्र होत बाँम्ब स्फोटाशिवाय चेंगराचेंगरीत मरुन पुण्य रुपी उरावं देवाच्या दरबारी – माणसं लाखोंनी मेली तरी… धर्म वाचवायला हवा परंपरेतला माणसांची पिलं काय जन्मतच असतात रोज!’
देवरे यांची कविता केवळ अनुभव दर्शनापुरती मर्यादित नसून मनात उमटणाऱ्या स्पंदनांची अमर्यादित दखल आहे.
‘नरांना ठेचून बैल बनवावं बैलांच्या शेपट्या पिरगळाव्या ओढाव्या
तरीही जागचा नाही हालला तर आऱ्या खुपसाव्या मांसात
बैलांनीही अंगावर आला तर शिंगावर घेत माणसांना चिरुन टाकावं आडवं उभं…’
मूल्यऱ्हासाची चीड आणि त्यामागील घटितांमध्ये ‘करुणे’पेक्षा टीकाटिप्पणी जास्त प्रमाणात येते. मर्ढेकर – करंदीकर माणसांची अगतिकता दाखवून मानव्य स्तरावर एक विशाल करूणाच व्यक्त करतात. ‘माझ्या मना बन दगड’ हे त्यांचं प्रारूप नाही का?
सुधीर देवरेंची कविता बाह्य घटना, व्यक्ती, दृश्य, समजुती यांमधून येते, तशी अंतर्मनातून, जीवन चिंतनातून, मत-मंथनातून वा नि:स्तब्ध अवकाश घेऊन येते. तिला उत्तेजित करायला काहीतरी मनात वा मनाबाहेर घडावं लागतं. काही घडलं की त्यांचं कवीमन जागं होतं. आणि ती जागृतीच कवितारूप घेते. स्वाभाविकपणे त्यांच्या कवितेत अभिव्यक्त होणारं त्यांच्या भावानुभवाचं आकृतीबंधक्षेत्र त्यांना स्पष्ट ‘दिसतं’. ह्या कवितेत जीवनातील संवादापेक्षा विसंवाद, असत्यता, अशिवता, कुरुपता, मानव्यद्रोह अतिशय संवेद्य स्तरानं व्यक्त होतं. म्हणून ही कविता रसिक प्रिय होते. मोजक्या शब्दांचा तिरकस वापर करून तरल आकृतिबंधाचं दर्शन देते. म्हणून तीत Personification अधिक आढळते. ह्या लकबीमुळेच त्यांच्या प्रतिमांची घडण साचेबंद होऊनही अस्वाभाविक होत नाही. आधिक्याने ‘स्व’अंकित अनुभूती असल्यानं कवीची जीवन प्रतिमांमधील दृष्टी वाचकांना भारावून टाकते. हे सर्व त्यांच्या अकृत्रिम रुढ भाषेत, आणि घडवलेल्या बोलीभाषेतही व्यक्त झालं आहे. भाषिक अलंकरणाचा सोस ह्या कवितेला नाही, इतकी ती रसदृष्ट्याही पारदर्शक आहे. अनुभूतींच्या विविध छटांचं दर्शन घडविण्यासाठी देवरे रुढ भाषेतील असांकेतिक संकेत वापरतात. त्यांची काव्यशैली पृथगात्मतेपेक्षा व्यामिश्र आहे. त्यामुळे काव्यांतर्गत अनुभव त्रोटक वाटला तरी अर्थदृष्ट्या विस्तृत होतो. (उदाहरणार्थ, ‘गांधी’ कविता.) कदाचित अनुभवाची स्पष्टता हेच देवरे यांच्या कवितेची शक्ती आहे. त्यालाच नावीन्य म्हणता येईल. प्रतिभानिर्मिती ही ‘प्रतिमा’च असते. देवरे यांची कविता प्रतिमांच्या जंजाळात गुंतत नाही. अल्पाक्षरत्व, सरलत्व आणि अनलंकृतपणा यामुळेच ह्या कवितांचं संवेदनमूल्य वाढलं आहे. कविता संपृक्त झाली आहे. ह्या संवेदनविश्वात केवळ प्रतिमांवर (म्हणजे चित्रांवर) भर नाही. स्मृती, रुची, गंध, स्पर्श यांचं संवेदन भरून आहे.
प्रतिकूल समाजावस्थेत झालेले डंख केवळ कवी- व्यक्तीच्या अनुभूतीचे नाहीत तर ते समाजाचेही ‘डंख’रुप आहे. इतरांच्या दु:खाची उत्कटताही कवी चित्रित करतो. मानसविश्वातील डंख कवी शब्दांच्या दृश्यात अनुभवतो. तरीही सामाजिक दुःखानं कवी हळहळताना, भावविवश होताना टोकाची भाषा वापरत नाही, याचं कारण आविष्कारातील ‘वस्तुनिष्ठता’ असावी. इथं क्रांतीची भाषा नाही की उद्वेगाचं प्रदर्शन नाही. कवितेत आत्मा‘रती’ आहे, तत्वामृत आहे. ही कविता ‘रती’ नसून स्वानुभूतीची आरती आहे. उव्दिग्न मनाचा ‘मुका स्वर’ आहे. विषयानुरूप भाषा आहे, तिच्यात सजावट नाही. अनेक स्थळी ती विचार संपृक्तही आहे. ‘भावानुभुतीचा संवेद्य आकृतीबंध’ हेच ह्या कवितांचं वैशिष्ट्य आहे. दीर्घ ओळींची कविता आहे, तशीच तीन, पाच ओळींचीही कविता आहे. मनातील आणि मनाबाहेरील विसंवाद दर्शन हेच ह्या संग्रहाचं प्रवाह-सूत्र आहे. ह्या कवीचं काव्यविश्व त्याच्या मनोवास्तवात सामावलेलं आहे. म्हणून तिथं सत्यशोधन व सौंदर्यबोधन नाही.
कवी वृत्ती ‘चिंतनशील’ असणं हा शाप आहे. (ही कविता चिंतनशील होते.) जसं संगीत ऐकताना त्या त्या रागात अनुरागानं बुडून गायचं की चिंतन करायचं? तसंच कवितेचं वाचन – आकलन म्हणजे तिच्या शब्दार्थांचं महात्म्य सांगणं नाही. खरा रसिक तोच जो यथार्थपणं आस्वाद घेतो. संवेदनेची सूक्ष्मता आणि जागरूकतेची उत्कटता अनुभवतो. जीवनातल्या असंगततेची भरपूर चित्रणं ह्या संग्रहात प्राधान्यानं येतात.
कवीचा टिळा लावून मिरवणं कवीला मंजूर नाही –
‘खरं तर फेकून द्यावी ही झूल
आणि उधळावं आडदांडपणे चौखूर…
आतला आवाज ऐकूनही
कवी कवितेच्या अमूर्त ग्रहावर
फुलांच्या रंगांची दगडं
गोळा करत
काळीज समजून
वैश्विक ओझं वाहत…’
ह्या आत्मकथनाची शरणता सौंदर्यान्वेषी आहे.
‘गांधी’ सारख्या कवितेत सामान्य माणसाचं खुजेपण कवी अधोरेखित करतो.
‘तुझ्या नालस्तीने भावना दुखावून रस्त्यावर उतरणार नाही कोणताही
प्रचंड मॉब.’
महात्मा गांधींना ‘महात्मता’ लाभली. त्यांना मरणोत्तरही अपशब्दांची लाखोली अज्ञानी – जणांकडून सोसावी लागत आहे. He is more dangerous than he alive म्हणून…
‘वीतभर अंतरावरुन
आम्ही झाडतो गोळ्या तरी तू मरत नाहीस.
….. तुला आठवावं लागतं रोज शिव्या देण्यासाठी का होईना
असा ‘एकवीस स्वर्ग उंच त्याहून तू वरती’
वैश्विक धर्माचा प्रेषीत!
कशावरही उभं राहून –
तुझ्यापर्यंत
पुरत नाही आमचा हात…’
महात्म्याबद्दलचं अडाणी प्रवृत्तीचं क्रौर्य कवीने भेदकपणे चितारलं आहे. ‘‘अलंकार आणि आभूषणं परिधान करून कोणतीही कविता अप्सरा ठरत नाही. कुलीन कविता ही आपल्या विदग्ध रसिकांपुढे निर्वस्त्र उभी राहाते. ह्या अवस्थेतही ती रसिकांची ‘वासना’ नव्हे, ‘साधना’ झालेली असते. कारण कवितेलाही तिचं स्वतःचं चारित्र्य असतं… कवी आणि समीक्षक / रसिक यांचं नातं कृष्ण – मीरेसारखं असतं.’’ (साहित्य समन्वय, पावसाळा विशेषांक, २०२१, संपा. सुमन गायकवाड, धारवाड, पृष्ठ १२) ह्या कविता वाचताना आठवलेलं अवतरण. कवी ‘वास्तव’, ‘वर्तमान’, ‘तत्क्षण’ पाहतो, कल्पकता सांभाळतो. त्याच्यातल्या घायाळ पक्ष्याला जरी आतून पुन्हा ‘फुटूच लागताच पंख…’ तरीही अंतराळात स्वैरपणं न उडता कवीने जमिनीवरच घट्ट पाय रोवलेले आहेत. जी कालातीत मूल्यव्यवस्था आहे तिचा वेध घेण्याचं कवीने धाडस केलं आहे.
वास्तवातून विमुक्त झाल्याशिवाय ‘वास्तव’ चित्रांकित होऊ शकणार नाही. कविता ही एका प्रतिभावंत मनाची विश्वमित्रासारखी नवनिर्मिती आहे. तिच्या आस्वादाची मूल्य तिच्यातच अनुस्युत असतात किंबहुना ती स्वतःची समीक्षा जन्मजात स्वतःसोबत घेऊन येते. म्हणून कवितेचा आस्वाद कवितेबाहेर जाऊन कालबाह्य निकषानं करू नये, हे कविताच सांगते.
‘इथून वाहतं तिथून वाहतं भळभळ वाहतं माझं दु:खं असंच का हे तसंच का ते खडळत राहतं माझं दु:खं घरभर दु:खं मनभर दु:खं सामोरं येतं ते ते दु:खं हातात वाहतं पायात वाहतं वाहत राहतं देहभर दु:खं
दु:खंच दु:खं खचाखचाने
खचून पाहतो जगभर दु:खं’
…….
‘नद्या प्रार्थना करत राहतात पावसाची
आपल्या पार्थिवात जीवात जीव आणून…
नद्यांचं पार्थीव माणसासारखं
सरणावर भस्मसातही होत नाही
नदीला मुक्ती मिळत नाही!…’
अशा दुःखाचा ‘अहम’ कवितेला कवितापण देऊन जातो. (त्यासाठी कलावंताला सुंदर ‘इगो’ पाहिजे.) म्हणून कवी देवरे यांची कविता विस्मरणाचा विषयच होत नाही.
डॉ. सुधीर देवरे यांच्या ‘फुटूच लागतात पंख’ या समग्र कवितासंग्रहातील अजून काही महत्वाच्या कवितांचा परामर्श घेता येईल. ‘कविता मला सापडते’, ‘नदी’, ‘रेनकोट’, ‘कोळी कीडा’, ‘खचून पाहतो जगभर दु:ख’, ‘मरण आपल्यालाच’, ‘देव सर्वमान्य झाला’, ‘डंख’, ‘सोंग’, ‘उंदीर कैलासवासी’, ‘कृष्णाची चूळ’, ‘३१ डिसेंबर’, ‘सावली शोधत फिरतात’, ‘कडेलोट’, ‘सैतान हसत नाही’, ‘ज्या संस्कृतीत दगडाला’, ‘फुत्कार’, ‘गढुळला कोरा डोह’, ‘देवाचा बाप’, ‘क्षणाक्षणानं जवळ येणारा’, ‘निभाव’, ‘फुटूच लागतात पंख’, ‘उत्तर’, ‘कोसळल्या नाहीत धारा’, ‘कुष्ट्या’, ‘कागदावरचं ऊन’, ‘तेव्हाही असंच व्हायचं’ या कवितांचा आवर्जून उल्लेख करावा, इतक्या महत्त्वाच्या या कविता आहेत.
डॉ. देवरे यांची कविता ही आजच्या काळातील वास्तवाची भीषणता दाखवणारी कविता आहे. मनोभंगाबरोबर समाज सामंजस्याचं तुटलेपण त्यांची कविता अधोरेखित करते. देवरे यांना नव्या काळातील मर्ढेकर म्हणता येईल, अशी त्यांच्या कवितेची पायवाट आहे. डंख आणि तत्संबंधित भावप्रतिमा त्यांच्या कवितेत ठळकपणे येतात.
माणसाच्या वर्तनाची क्षुद्रता ‘कोळी किडा’ या कवितेत चित्रित झाली आहे. या कवितेतील उपरोध लक्षणीय आहे. सामान्यांची क्षुद्रता म्हणजे कोळी किडा असून इथं जैविक व्यवधानाची विपरीत ‘रीती’ दाखवली जाते. कोळी आणि कीटक यांच्यात राजकीय डावपेच असल्याचं चित्र असून मानवी व्यवहाराची विपरीतता दर्शविली आहे. हीच रीती,
‘भाऊबंद मढं उचलायला येतात
उरलेले दारावर
मरण आपल्यालाच मरावं लागतं’ –
अशा मानवी सत्याचा निर्देश करते. हीच कहाणी ‘मायावी’, ‘डंख’, ‘मी कोण’, ‘निभाव’, ‘कुष्ठ्या’, ‘देवाचा बाप’, ‘ज्या संस्कृतीत दगडाला’ इत्यादी कवितांत येते. देव, अंधश्रद्धा, प्रारब्ध याविषयीचं ‘विरूपीकरण’ ह्या संग्रहात आहे.
‘माणूस’ होणं ही गोष्ट साधी सोपी नाही. ‘देवाचा बाप’ मधील देव आणि माणूस याच्यांतला संवाद मनाला हादरविणारा आहे. माणसाला देवाचा बाप म्हटल्यामुळं देव अस्तित्वहीन झाला आहे. कविता म्हणते, देवानं नव्हे, माणसानं देवाला जन्माला घातलं! देवाचं सोंग घेऊन माणूसपण वठवता येत नाही, असं कविता सांगते.
‘उंदीर कैलासवासी’ ह्या कवितेतला उपरोध माणसाचं माणसापासूनचं ‘तुटलेपण’ सांगतो. ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ ह्या नावाची बा. सी. मर्ढेकर यांची कविता आहे. सामान्य माणसाचं गर्दीतलं मरण मर्ढेकर या कवितेत दाखवतात. इथं पिप हे जीवनातील वयैर्थतेचं प्रतिक आहे. कवी ह्या कवितेत मानवी जीवनातील निरर्थकता साक्षात करतात. डॉ. देवरे ह्यांना दिसणारा हा उंदीर म्हणजे साक्षात माणूस! आणि त्याला कैलासवासी करणारा पलीकडील हैवान म्हणजे अनेक भाकड कल्पना. माणूस परिस्थितीपुढे अगतिक, हतबल होत घाबरून ‘कैलासवासी’ होतो. हीसुध्दा एक प्रकारे विरुपिकाच आहे. माणसाची क्षुद्रता आणि त्याच्या भोवतालच्या संकटांची उग्रता यातील व्दंन्व्द या कवितेत चित्रीत झालं आहे.
‘अलीकडून माणसं दिसतात
पलीकडून हैवान
हत्ती.. घोडा.. कुत्रा.. मांजर..
जसं फिरेल मैदान…
या भोकातून पाणी दिसतं
त्या भोकातून गाणी
देता देता बळजबरी-
उचक्या…
उंदीर कैलासवासी!’
बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेतील उंदीर कसा मेला, ते सुधीर देवरे सांगतात, उचक्या देऊन, भयाने. मर्ढेकरांच्या मूळ कवितेचं हे विडंबन आहे.
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांच्या काव्यानुभूतीत विलक्षण जिवंतपणा आहे आणि रचनेची सुश्लीष्टता आहे. म्हणून या कवितांचा तत्वत: आकृतिबंध आणि आशय अव्दैती आहे. या कवितांचा रुपबंध हाच आंतरिक घाट आहे. अनुभूतीच्या घटकांची संगती आणि संबंध ह्यातून हा आंतरिक घाट अविष्कृत झाला आहे. ज्याला आपण ‘अनुभव’ म्हणतो, जे कवीनं पाहिलंय, जे रसिक वृत्तीला जाणवलंय ह्या पासून कवी सुरुवात करतो. त्यातच त्याच्या भावस्थितीचं समराधन आहे. इथं तार्किकीय पद्धतीची संरचना नसून आस्वादाची संरचना आहे. मुक्त मनानं परिकल्पनांचा वेध घेत कवी आपल्या कल्पनाविश्वाला वास्तव जगात रूपांतरित करून घेऊ शकला आहे. कवीची ‘अभिरुची’ असौंदर्यात्मक अशा इंद्रियांवर रचलेल्या आकृतीबंधातून आलेली आहे. ही अभिरुची काव्यानुभूतीला चांगलाच न्याय देते. कवीमन मुक्तपणे स्वानुभवाची पुनर्रचना करून त्यास प्रतिरूप देते. रूपबंध अधिक सुश्लिष्टपणे घडतो म्हणून वाचकांनाही वास्तवाची ‘पुनर्रचना’ सादर करतो.
मी केलेलं विश्लेषण माझ्या आस्वादकप्रक्रियेशी मिळतंजुळतं आहे वा नाही हा प्रश्नच नाही. तथापि माझ्या भावस्थितीला समाधानकारक प्रतिसाद देणाऱ्या रूपबंधाचा माझा शोध काव्य रसिकांना ह्या कवितांची नव्यानं ओळख करून देईल असं मला दिसतं. आजची एकविसाव्या शतकातील नव्या पिढीची कविता ज्ञानवादी – व्यवहारात्मक असल्यानं ती ‘सामाजिक’ समजुतीची झाली आहे. डॉ. सुधीर देवरे यांची पुष्कळशी कविता या समजुतीपासून अलिप्त असून तिचा रूपबंध कलावादी – सौंदर्यदायी आहे, यातच चाळीस वर्षांतील या कसदार कवितांचं सत्व आणि स्वत्व आहे, हे मला जाणवलं आहे.