google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…म्हणून केले मौल्यवान तूरडाळीचे जाणीवपुर्वक नुकसान?’

पणजी :
परकीय व्यापार महासंचालनालयाने (डिजीएफटी) २०२१-२२ ते २०२५-२६ या पुढील ५ आर्थिक वर्षांमध्ये खाजगी व्यापाराद्वारे दरवर्षी हजारो टन तूर डाळ आयात करण्यास एकीकडे मान्यता दिली असताना, गोव्यातील बेजबाबदार भाजप सरकारने खराब झालेल्या तूर डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदी-शहांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी मुद्दाम सदर तूर डाळ खराब केली का? याचे स्पष्टिकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने आज स्थानिक दैनिकांमध्ये खराब झालेल्या तूर डाळीच्या विल्हेवाटीसाठी निवीदा मागविणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचा संदर्भ देत, अमरनाथ पणजीकर यांनी डिजीएफटी द्वारे १८,जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचना क्र. १७/२०१५-२० कडे लक्ष ओढले आहे व पुढील पाच वर्षांसाठी तूर डाळ आयात करण्याचे सरकारचे धोरण उघड केले आहे.

सदोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बेजबाबदार भाजप सरकारने आज स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन खराब झालेल्या तूर डाळीच्या विल्हेवाटीसाठी निविदा मागविल्याची पाहुन धक्काच बसला असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काही महिन्यांपूर्वी तूर डाळीचे भाव जवळपास २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. आजही तूर डाळीचा बाजारभाव १०० रुपये किलोच्या वर आहे. दुसरीकडे खराब झालेल्या तूर डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी सरकार बोली आमंत्रित करणारी नोटीस जारी करते. त्याला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.

भाजप सरकार मुद्दाम डाळींच्या आयातीतून मोदी-शहांच्या क्रोनी क्लबला माया कमविण्यासाठी डाळींची साठेबाजी करून त्या नष्ट करीत आहे. देशातील भांडवलदारांची तिजोरी भरण्यासाठी सरकारची तिजोरी रिकामी करण्याचे भाजप सरकारचे धोरण आहे असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मी गोव्यातील जनतेला आवाहन करतो की, खूप उशीर होण्यापूर्वी जागे व्हा आणि येत्या पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून त्यांना धडा शिकवा. आताच भ्रष्ट भाजपवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले तर ते गोवा क्रॉनी क्लबला विकतील असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!