‘काजूला रु. 175 प्रतिकिलो आधारभूत किंमत ही तर काँग्रेसची मागणी’
मडगाव :
गोव्यातील काजूला रु. 175 प्रति किलो आधारभूत किंमत द्यावी ही माझी गेल्या दोन वर्षांची मागणी आहे. आता लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून कृषी विभागाने काजूला रु. 170 रुपये देण्याचा आधारभूत किंमत देण्याचा प्रस्ताव पुढे केला असल्याचे समजते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब ₹175 प्रति किलो दराची अधिसूचना जारी करावी आणि त्याचे श्रेय केवळ काँग्रेस पक्षाला द्यावे, अशी मागणी केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केली आहे.
कृषी विभागाने काजूला 170 रुपये आधारभूत किंमत देण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना एल्टन डिकोस्ता यांनी, निवडणुकीत फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आमिष दाखविण्याचा भाजपचा हा निवडणूक जुमला आहे असा आरोप केला आहे.
सरकारला हिम्मत असेल तर त्वरित अधिसूचना जारी करू द्या. परंतू, माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच भाजप सरकारला आधारभूत किंमत वाढवण्यास भाग पाडले हे सत्य आहे, असा दावा एल्टन डिकोस्ता यांनी केला आहे.
मी काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काजू शेतकऱ्यांची दुर्दशा दाखवली होती. गोव्यातील लोकांनी त्या व्हिडीओमध्ये मागणी नसल्यामुळे काजूबीयांसह काजूचे फळ कसे सडायला सोडले जातात हे पाहिले होते. दुर्दैवाने, शेतकरी रडत असताना सरकार कार्यक्रम साजरे करण्यात व्यस्त राहिले, असा टोला एल्टन डिकेस्ता यांनी हाणला आहे.
भाजप सरकारने जुमलाबाजीच्या कलेवर प्रभुत्व मिळवले आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या पण अंमलबजावणी मात्र होत नाही. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत 35 टक्के उत्तीर्ण होण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे, असे एल्टन डिकोस्ता यांनी नमूद केले.
मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, जोपर्यंत 175 रुपये प्रति किलो आधारभूत किंमत असलेली अधिसूचना जाहीर होत नाही आणि वास्तविक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवू नका, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.