गोव्यात सुरू झाला ‘बीएएमएस’ अभ्यासक्रम
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा येथे बीएएमएस अभ्यासक्रमासाठी 100 विद्यार्थ्यांच्या पहिली तुकडीचा शिष्योपनयन संस्कार कार्यक्रम आज संपन्न झाला. केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालक, डॉ तनुजा नेसरी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या आयुष मंत्रीपदाच्या कारकिर्दीत हा प्रकल्प गोव्यात आणता आला याबद्दल आनंद व्यक्त केला. जमीन पाहणी, प्रकल्पाची पायाभरणी ते उद्घाटन आणि आता पहिल्या तुकडीचे स्वागत याविषयीचे अनुभव त्यांनी याप्रसंगी सांगितले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमुळे गोव्यात वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि आयुष आणि संलग्न क्षेत्रात प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिलाफ उपलब्ध करून दिल्याबद्दल गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे कौतुक केले.
11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधानांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे लोकार्पण केले होते. गोव्यातील संस्थेत दिल्ली येथील संस्थेत उपलब्ध असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक, निदान आणि आरोग्य सुविधा पुरवण्या येणार आहेत तसेच 14 पदवीपूर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुविधा याठिकाणी आहे.