पणजी :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘म्हादई वळविण्याच्या’ विषयावर आपले विचार स्पष्ट करावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
गोवा काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी गुरुवारी सांगितले की, आता संपूर्ण आशा प्रधानमंत्र्यावर आहे, जे किमान धैर्य दाखवू शकतात आणि सांगू शकतात की म्हादई वळविली जाणार नाही.
“मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांचे कौतुक केले, असे गोव्यातील भाजप नेते फुशारकी मारतात. आता या नेत्यांनी त्यांना सांगण्याची हिंमत दाखवावी आणि म्हादई बद्दल बोलण्यात भाग पाडावे. या माध्यमातून भाजपने गोव्यासारख्या छोट्या राज्यावर आपले प्रेम दाखवावे,”असे पणजीकर म्हणाले.
भाजपवर निशाणा साधत पणजीकर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोवा राज्यातील लोकांसमोर म्हादईच्या मुद्द्यावर सत्य बोलण्याची हिंमत दाखवण्यात अपयशी ठरले.
“म्हादईबद्दल खरे बोलण्याचे धाडस दाखवण्यात ते अपयशी ठरले आहेत, आता त्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगून आपले नशीब आजमावावे आणि म्हादईच्या प्रश्नावर बोलायला सांगावे की ते कर्नाटकला पाण्याचा एक थेंबही देणार नाही,” असे पणजीकर म्हणाले.
जानेवारीत कर्नाटकातील बेळगावी येथे झालेल्या जाहीर सभेत शहा यांनी आपल्या भाशणात केंद्राने, गोवा आणि कर्नाटक यांच्यातील म्हादई बद्दलचा दीर्घकाळाचा वाद सोडवला आहे आणि कर्नाटकाती अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी म्हादई कर्नाटकात वळवण्यास परवानगी दिली आहे असे म्हटले होते. त्यांचा संदर्भ देत पणजीकर म्हणाले की या संदर्भात आज पर्यंत भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.
” मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपच्या इतर नेत्यांना अमित शहा यांच्या उपस्थितीत या विषयावर स्पष्टीकरण देण्याची चांगली संधी मिळाली होती, परंतु ते अपयशी ठरले. आता भाजपला म्हादईबद्दल त्यांचे विचार मांडण्यासाठी मन की बातचे व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक आणि गोव्याबरोबरच इतर सर्व राज्यांना भाजपचे लहान राज्यांबद्दलचे प्रेम कळणार,” असे पणजीकर म्हणाले.
अलीकडेच गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले होते की, भाजप नेत्यांमध्ये “कर्नाटकातील प्रसार माध्यमांनाही सांगण्याची हिंमत आहे की गोवा सरकार म्हादई नदीच्या प्रश्नावर तडजोड करणार नाही”. यावर पणजीकर म्हणाले, कर्नाटकात प्रसारमाध्यमांसमोर बोलायचे विसरून जा, गोव्यातच भाजपचे नेते विधान करण्यात अपयशी ठरले आहेत.
“गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हादईवर प्रेम करणारे आम्ही गोव्यातील लोक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून म्हादईचे पाणी वळवले जाणार नाही, हे ऐकण्यास उत्सुक आहोत,” असे पणजीकर म्हणाले.
“प्रधानमंत्री पुढील काही दिवस कर्नाटकात प्रचार करणार हे सार्वजनिक आहे. गोव्यातील भाजप नेते त्यांना कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान म्हादईच्या मुद्द्यावर बोलण्यास सांगू शकतात, ज्यामुळे मोठी राज्ये की छोटी राज्ये भाजप नेत्यांच्या हृदयाच्या जवळ आहेत, हे सिद्ध होईल,” असे पणजीकर म्हणाले.
गोव्यातील सभेत अमित शहा म्हणाले होते की, गोव्यासारख्या छोट्या राज्यांसाठी केंद्राची जबाबदारी आहे.