
‘सरकारी प्राथमिक शाळा आपच्या ताब्यात द्या’
पणजी:
आप गोवा युनिटचे अध्यक्ष अॅड अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखालील आप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण संचालनालयचे संचालक शैलेश झिंगाडे यांना निवेदन सुपूर्द करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारी प्राथमिक शाळांच्या विलीनीकरणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
सरकारी प्राथमिक शाळांच्या विलीनीकरणाच्या सरकारच्या निर्णयावर चिंता व्यक्त करत, आप विलीन होणार्या सरकारी प्राथमिक शाळेची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे सांगितले.
जर गोव्यातील मुलांना त्यांच्या गरजेच्या आणि पात्रतेच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यास सरकार अपयशी ठरल्याचे सरकारने मान्य केल्यास आप या शाळांचा ताबा घेण्यास तयार आहे. आम्ही आमच्या दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळेतील पटसंख्या कशी वाढवायची आणि शाळेचा निकालही कसे सुधारायचे ते दाखवू, असे पालेकर म्हणाले.
प्रत्येक मुलाला सुलभरित्या शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत दयानंद बांदोडकर यांनी राज्यभरातील जवळपास प्रत्येक गावात सरकारी प्राथमिक शाळा स्थापन करून शिक्षणाचा पाया घातला. या महान द्रष्ट्याने केलेल्या या विशिष्ट कृतीमुळे गोव्याला भारताच्या साक्षरतेच्या दरात सर्वोच्च स्थान मिळाले. मात्र, अलिकडच्या वर्षांत भाजप सरकारने सरकारी प्राथमिक शाळांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहेच शिवाय शिक्षणाचा दर्जाही घटला आहे, असे पालेकर यांनी सांगितले.
पालेकर यांनी नमूद केले की, गोव्यातील बहुतांश लोक अजूनही गावात राहतात. त्यांचे घर शाळेच्या जवळच असल्यामुळे मुलांना या प्राथमिक शाळांमध्ये जाणे सोपे वाटते. परंतु यापुढे जर शाळांचे विलीनीकरण झाले तर मुलांना त्यांच्या घरापासून सुमारे 4-5 किमी अंतरावर असलेल्या शाळेत जावे लागेल. बर्याच गावांमध्ये वाहतूक सेवा सुरळीत नसल्यामुळे विदयार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
यावेळी उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे आणि वाल्मिकी नाईक, राष्ट्रीय युवा विंगच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स, मुख्य प्रवक्ता राजदीप नाईक आणि सुनील सिग्नापूरकर उपस्थित होते.