
सिनेनामा
‘टूलूस इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये होणार ‘गुंचा’चा वर्ल्ड प्रीमियर
कोंकणीसह मल्याळम, तेलुगू, मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारणारी गोमंतकीय अभिनेत्री रावी किशोरच्या ‘गुंचा’ या हिंदी लघुपटाची फ्रान्समधील प्रतिष्ठित टूलूस इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी अधिकृत निवड झाली आहे. २३ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सिनेमहोत्सवात ‘गुंचा’चा जागतिक प्रीमियर होणार आहे. हिमांशू सिंहने या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून, या लघुपटात मुंबईतील वेगवेगळ्या आर्थिक पार्श्वभूमीतील दोन महिलांची भूमिका रावी किशोर आणि गौरी कडू यांनी साकारली आहे.
हिमांशू सिंग दिग्दर्शित, गुंचा हा महानगरातील एका सर्वसामान्य, स्वतःची वेगळी ओळख नसलेल्या कामगारांची गोष्ट आहे. आपल्या या लघुपटाच्या या यशाबद्दल हिमांशू सांगतो कि, “या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या जगण्यातील गुंतागुंत समजून घेण्याचा आणि सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कामगार वर्गातील व्यक्ती आपल्या मानवीय संवेदनशीलता मोठ्या शहरांमध्येही कशा प्रकारे आणतात आणि त्या आपल्यापरीने सांभाळतात हे आम्ही यात दाखवले आहे. त्यामुळे ‘टुलूस’च्या माध्यमातून महानगरातील कष्टकऱ्यांची गोष्ट जागतिक पातळीवर पोहोचेल असा विश्वास आम्हाला नक्की वाटतो.’
कुपांचो दर्यो, अर्धो दीस, घरटं या इफ्फिसह जगभरातील विविध सिनेमहोत्सवात गाजलेल्या कोंकणी लघुपटांमध्ये रावी किशोर आणि हिमांशू सिंह यांनी कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून सातत्याने एकत्र काम केले आहे. या जोडीचा ‘गुंचा’ हा पहिलाच हिंदी लघुपट असून विशेष गांधी यांनी मुंबईतील पावसात याचे प्रभावी चित्रीकरण केले असून, गोपाल सुधाकरने संकलन, तर पंकज कटवारेने कला दिग्दर्शन केले आहे.


– हिमांशूचा सलग दुसरा लघुपट ‘टुलूस’मध्ये…
गुंचाच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हिमांशू सिंहने दिग्दर्शित केलेला हा दुसरा लघुपट सलग दुसऱ्या वर्षी टूलूस इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडला जात आहे. गेल्या वर्षी हिमांशू दिग्दर्शित आणि गोव्यातील सहित स्टुडिओ निर्मित ‘पीस लिली सँड कॅसल’ या कोंकणी लघुपटाचीदेखील सदर सिनेमहोत्सवात अधिकृत निवड झाली होती.
या लघुपटात आम्ही साकारलेली गोष्ट हि घरापासून दूर राहून घराची काळजी करणाऱ्या आणि त्यासाठी शक्य ते सगळे कष्ट करू इच्छिणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य माणसांची गोष्ट आहे. आणि दिग्दर्शक हिमांशू सिंह यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अशा पध्द्तीची भूमिका दिली, हि माझ्यासाठी खूप महत्वाची आणि जबाबदारीची बाब होती. यानिमित्ताने मी प्रथमच मुंबईच्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये शूटिंग केले. त्यासाठी सगळ्या टीमने विशेष कष्ट घेतले, आणि आता ‘टुलूस’ साठी ‘गुंचा’ची निवड होणे हि आम्हा सगळ्यांच्या मेहनतीची पोचपावती आहे, असे मी मानते.– रावी किशोर.
