
पणजी :
देशाच्या इतिहासातील झालेला पहिला आणि शेवटचा ‘ओपिनियन पोल’ झाला तो गोव्यासाठी. पोर्तुगीजांच्या करालपाशातून गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्याचे अस्तित्व स्वतंत्र राज्य म्हणून राखायचे की हे महाराष्ट्र राज्यात विलीन करायचे यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने घेतलेला अभूतपूर्व निर्णय म्हणून ‘ओपिनियन पोल’ म्हणजेच ‘सार्वमत कौल’कडे पाहिले जाते. १६ जानेवारी १९६७ रोजी झालेल्या या ऐतिहासिक ‘ओपिनियन पोल’चा प्रवास आता रुपेरी पडद्यावर येत असून, ‘सहित स्टुडिओ’च्या ‘गोवाज ओरल हिस्टरी’ उपक्रमांअंतर्गत ‘१६ जानेर’ या पहिल्या भागाची घोषणा आज ”ओपिनियन पोल’ दिनानिमित्त करण्यात आली.
आपल्या माणकुल्या गोव्याने स्वतःच्या सबळ अस्तित्वासाठी देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा जास्त संघर्ष पाहिला आणि केला आहे. आजचा गोवा हा आपल्या सर्व पूर्वसुरींच्या संघर्षाच्या पायावरच उभा आहे. त्यामुळेच आजही आपण आपली स्वतंत्र अस्मिताय टिकवून आहोत, पण खेदाची बाब म्हणजे गोव्याचा हा सगळा संघर्षाचा प्रवास गोव्यातील नव्या पिढीपर्यंत आणि त्याचवेळेला गोव्याबाहेरील जनतेपर्यंत योग्यरितीने पोहोचलाच नाही. याला अर्थात अनेक करणे असू शकतील, पण आता माध्यमक्रांतीनंतर तरी वेगवेगळ्या माध्यमातून गोव्याचा हा संघर्ष राज्यासोबतच जगभरात हा लढा पोहोचवलाच पाहिजे, असे आम्हाला गेल्या काही वर्षांपासून प्रकर्षाने वाटत होते, त्यातूनच ‘गोवाज ओरल हिस्टरी’ उपक्रम पुढे आला. आणि त्यातील पहिला भाग आम्ही ‘ओपिनियन पोल’वर साकारत आहोत, असे या प्रकल्पाचे संशोधक, लेखक आणि दिग्दर्शक किशोर अर्जुन यांनी सांगितले.

१६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याने स्वतंत्र राज्याच्या बाजूने आपला कौल देण्यापूर्वी राज्यात आणि देशात यासंदर्भात काय काय घडामोडी झाल्या इथपासून ते आज त्या सगळ्या संघर्षचा राज्याला आणि पर्यायाने गोंयकारांना काय फायदा – तोटा वाटतो आहे, असा एक मोठा पट ‘१६ जानेर’मधून आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी विविध अभ्यासक आणि या लढ्यात प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतलेल्यांच्या सविस्तर मुलाखती, ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाचे दाखले आणि जगभरातील या विषयावरील महत्वपूर्ण संदर्भ यांचा या ‘डॉक्यु-फिक्शन’मध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे, किशोर अर्जुन यांनी यावेळी नमूद केले असून, लवकरच सदर माहितीपट पूर्णत्वाला नेऊन विविध आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दुर्मिळ छायाचित्रे, कागदपत्रांसाठी आवाहन
लोकवर्गणी आणि लोकसहकार्यातून साकारण्यात येत असलेल्या या माहितीपटासाठी आम्ही विविध व्यक्ती, पुस्तके, ग्रंथालये आणि इंटरनेटवर भेट देऊन कित्येक दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रे संकलित केली आहेत. तरीदेखील काही व्यक्तींकडे अद्याप अजून वेगळी माहिती, छायाचित्रे किंवा कागदपत्रे असू शकतात, आणि त्यांचा या माहितीपटासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो, त्यामुळे गोंयकरांनी सदर माहिती, छायाचित्रे, कागदपत्रांच्या नक्कलप्रती edit.sahit@gmail.com येथे पाठवून देऊन आवर्जून सहकार्य करावे, असे आवाहन करत, सहित स्टुडिओच्या वतीने आजवर निर्माण करण्यात आलेल्या विविध कोंकणी लघुपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळाल्यामुळे सदर उपक्रमाबद्दल आम्ही अधिक आश्वस्त असल्याचेही यावेळी सहितच्या रश्मी नर्से आणि सुनंदा काळुसकर यांनी सांगितले.