google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

“अस्मिताय दीस” साजरा करणे हे सरकारचे कर्तव्य : प्रभव नायक

मडगाव :

१६ जानेवारीचा ओपिनियन पोल दिवस “अस्मिताय दीस” म्हणून अधिकृत कार्यक्रमाने साजरा करण्याची स्वतःची बांधिलकी पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले हे सर्वात दुर्दैवी आहे. हा ऐतिहासिक दिवस साजरा करणे आणि गोव्याची ओळख टिकवून ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात गोमंतकीयांचे स्मरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगत  मडगावचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी यंदाचा अस्मिताय दिवस साजरा न केल्याबद्दल सरकारवर टीका केली.


१९ जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत १६ जानेवारी हा दिवस “अस्मिताय दिवस” म्हणून दरवर्षी अधिकृत कार्यक्रमाने साजरा केला जाईल, असे आश्वासन दिल्याचा व्हिडिओ जारी करून, प्रभव नायक यांनी १६!जानेवारी २०२५ रोजी कोणताही कार्यक्रम आयोजित न केल्याबद्दल सरकारचा समाचार घेतला. ओपिनियन पोल दिवसाचे औचित्य साधून वर्तमानपत्रात साधी जाहिरात प्रसिद्ध करणे सरकारला जमले नाही हे धक्कादायक आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


ओपिनियन पोलमुळेच गोव्याची ओळख कायम राहिली. १६ जानेवारी १९६७ च्या सार्वमतामुळेच पूढे कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळू शकला आणि नंतर गोवा हे भारताचे २६ वे घटकराज्य बनले, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन सरकार कसे विसरु शकते? यावरून प्रशासन कोलमडल्याचे स्पष्ट  दिसून येते, असे प्रभव नायक म्हणाले.


माझे पणजोबा नरसिंह दामोदर नायक, माझे आजोबा अनंत उर्फ बाबू नायक, डॉ. जॅक सिक्वेरा, पुरुषोत्तम काकोडकर, शाबू देसाई, रवींद्र केळेकर, शंकर रामाणी, वासुदेव सरमळकर, उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी, उल्हास बुयांव, एन. शिवदास, व्हिक्टोरिया फर्नांडिस, रवी नाईक आणि इतर अनेकांनी १९६७ मध्ये गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते हे आपण स्मरणात ठेवले पाहिजे, असे प्रभव नायक म्हणाले.


मडगावचो आवाज २०२६ पासून १६ जानेवारीला खास कार्यक्रम आयोजित करुन ओपिनीयन पोल दिवस साजरा करणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले दिवस साजरे केल्याने नवीन पिढीला इतिहास समजण्यास सोपे जाते. सरकारला लवकरच सुबुद्धी येवो आणि महत्वाचे दिवस साजरे करण्याचा निर्णय होवो, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!