गोवा

फातोर्डातील साडेचार हजार मतदारांची नावे वगळल्याचा सरदेसाईंचा दावा

सासष्टी : विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेत फातोर्डा मतदारसंघातील सुमारे साडेचार हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी केला. काही मतदारांची घरे, जमीन आणि शेती असतानाही त्यांची नावे ‘स्थानांतरित’ या कारणाने मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदारांची नावे वगळण्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप करताना सरदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षांनी परस्परांवर आरोप करण्याऐवजी वगळण्यात आलेली नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. फातोर्डातील वगळण्यात आलेली सर्व साडेचार हजार नावे पुन्हा समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे बूथस्तरीय प्रतिनिधी (BLA) संबंधित अधिकाऱ्यांकडून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी मागवतील. त्यानंतर या मतदारांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील सहा नावे वगळली

दवंडे येथील क्रास्तो कुटुंबातील सहा सदस्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचे प्रकरणही सरदेसाई यांनी मांडले. या कुटुंबातील तेरेझीना क्रास्तो आणि इतर सदस्यांनी सरदेसाई यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.

क्रास्तो यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील केवळ दोन सदस्य नवीन फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मात्र, उर्वरित चार सदस्य अद्याप दवंडे येथेच राहत असूनही त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी गेल्यानंतर मतदारयादीत नावे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे त्यांनी सांगितले.

‘काही नेपाळी नागरिकांची नावे यादीत’

फातोर्डा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना काही नेपाळी नागरिकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आल्याचाही दावा सरदेसाई यांनी केला. या प्रकरणात फातोर्डाच्या माजी आमदाराचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी या वृत्तातून झालेली नाही.  

फातोर्डातील काही मतदारांनी मागील निवडणुकीत भाजपला मतदान केले नसल्यामुळे किंवा आगामी निवडणुकीतही ते भाजपला मतदान करणार नसल्याच्या शक्यतेमुळे त्यांची नावे वगळण्यात आली असावीत, असा आरोपही सरदेसाई यांनी केला.

दरम्यान, गोव्यातील SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळणे आणि त्यानंतर फॉर्म ८ अर्ज नाकारण्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत.  

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!