गोवा

‘‘गोंय राखण यात्रे’त कुंकळ्ळीलाच प्राधान्य का?’

मडगाव, नावेली आणि कुडतरीतील कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा विशाल पै काकोडे यांचा आरोप

पणजी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘गोंय राखण यात्रे’च्या नियोजनात वारंवार कुंकळ्ळीला प्राधान्य दिले जात असल्याबद्दल काँग्रेस समर्थक आणि राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मडगाव, नावेली आणि कुडतरी येथील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचा पक्ष नेतृत्व अनादर करीत आहे का?असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी कुंकळ्ळी येथे ‘गोंय राखण यात्रे’त सहभागी होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्या दिवशी यात्रेचे नियोजन मडगाव आणि नावेली येथे करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांचा दौरा एक दिवस आधी, म्हणजेच रविवार, ११ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आला. त्या दिवशी यात्रा कुडतरी येथे नियोजित होती. आता राहुल गांधी कुंकळ्ळी येथे येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पै काकोडे यांनी या नियोजनावर आक्षेप घेतला आहे.

‘कुंकळ्ळीलाच वारंवार प्राधान्य का?’

राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या नियोजनात दोन्ही वेळा कुंकळ्ळीला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसते. मग मडगाव, नावेली आणि कुडतरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न पै काकोडे यांनी उपस्थित केला.

मडगाव हे दक्षिण गोवा तसेच कुशावती जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनाही यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची आणि पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

निर्णयामागे राजकीय रणनीती?

कुंकळ्ळीला वारंवार प्राधान्य देण्यामागील कारण काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट करावे, अशी मागणी पै काकोडे यांनी केली. हा निर्णय पक्षाच्या व्यापक हितासाठी घेण्यात आला आहे की काही मोजक्या नेत्यांचे निवडणुकीतील राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे, असा सवालही त्यांनी केला.

यात्रेच्या नियोजनाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी काँग्रेस नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले.  

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!