मोदी-शहांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही
आंदोलनकर्त्यांना रोखण्यावरून राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुंबई : दिल्लीतील कॉक्रोज जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी-शहा यांच्या मनात पराकोटीची हुकूमशाही असल्याचा आरोप करत, आंदोलनकर्त्यांना केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे ताब्यात घेतले जात असेल, तर अशा बेबंदशाहीला देशातून उखडून काढले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP ने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलक आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर सविस्तर भूमिका मांडत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘स्वातंत्र्यापेक्षा कोणताही नेता मोठा नाही’
राज ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत, ‘No nation can be grateful at the cost of its liberty’ या विधानाची आठवण करून दिली. कोणत्याही नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी देशाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावता कामा नये, असे त्यांनी म्हटले.
मोदी आणि शहा यांनी देशातील संस्थांवर नियंत्रण मिळवून सत्ता राबविल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांना विरोध केला किंवा त्याविरोधात निदर्शने केली म्हणून नागरिकांना ताब्यात घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण?’
देशात आंदोलन करायचेच नाही का, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचेच नाहीत का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजाबाबत आक्षेप असतील, तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात गैर काय, असेही त्यांनी विचारले.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत शंका निर्माण होत असतील, तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार नागरिकांना असला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महिला पत्रकारांच्या तक्रारींचाही उल्लेख
दिल्लीतील आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांना पोलिसांकडून त्रास दिल्याच्या तक्रारी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. आंदोलकांना रोखण्यासाठी रस्ते अडविणे, मेट्रो आणि बससेवेवर निर्बंध आणणे तसेच इंटरनेट सेवा बंद करण्याच्या निर्णयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणांना रोखण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. आंदोलनकर्त्यांप्रमाणेच वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या अधिकारांचेही संरक्षण झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
‘सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही’
सत्ताधाऱ्यांनी आपण कायम सत्तेत राहणार असल्याच्या भ्रमात राहू नये, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. मुघल, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या सत्तेला भारतीय जनतेने आव्हान दिल्याचा इतिहास लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या शांततापूर्ण आंदोलनांचा अभ्यास करण्याचा सल्ला देताना, सरकारने अधिक जबाबदारीने वागावे, असे ठाकरे यांनी म्हटले. देशातील प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.







