गोवा

प्रत्येक घराला ३०० युनिट मोफत वीज देण्याची ‘आप’ची मागणी

पणजी : राज्यातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या घटनांवरून आम आदमी पक्षाने (आप) राज्य सरकार आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली आहे. अखंडित वीजपुरवठा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रत्येक घराला दरमहा ३०० युनिट मोफत वीज देण्याची मागणी पक्षाने केली.


आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, संघटन सचिव प्रशांत नाईक आणि उपाध्यक्ष सुनील सिंगणपुरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. राज्यातील वीजपुरवठ्यातील अडथळ्यांचे कारण हवामान किंवा तांत्रिक प्रक्रिया नसून पायाभूत सुविधांतील त्रुटी आणि अपुरी देखभाल असल्याचा दावा त्यांनी केला.


वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत राज्यात सुमारे १९ हजार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याची नोंद आहे. ग्रिड बिघाड, वीजतारा तुटणे, खांब पडणे, झाडे कोसळणे, भूमिगत केबल बिघाड, ट्रान्सफॉर्मर निकामी होणे आणि सबस्टेशन ट्रिपिंग यांसारख्या कारणांमुळे या घटना घडल्याचा उल्लेख त्यांनी केला. या समस्या अपुऱ्या देखभाल व्यवस्थेचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.



स्मार्ट मीटर प्रकल्पासाठी सुमारे ८९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असताना वीज वितरण व्यवस्था आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुरेशी गुंतवणूक करण्यात आली नसल्याचा आरोपही पक्षाने केला. राज्यभर वाढीव वीजबिलांविरोधात आणि स्मार्ट मीटरविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांनंतरच सरकारला काही निर्णय मागे घ्यावे लागल्याचा दावा आप नेत्यांनी केला.


प्रशांत नाईक यांनी दिल्ली आणि पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारांचा दाखला देत गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज देण्याची मागणी केली. गोव्यात ही योजना राबविण्यासाठी अंदाजे ३५० कोटी रुपयांचा खर्च येईल, असा पक्षाचा दावा आहे.



सुनील सिंगणपुरकर यांनीही सरकारच्या वीज धोरणावर टीका करत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अधिक ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!