गोवा

‘कनेक्ट विथ गोवा CLP’; जनतेला थेट विधानसभेत आवाज देण्याचे काँग्रेसचे आवाहन

पणजी : आगामी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘कनेक्ट विथ गोवा CLP – आवाज तुमचो, सांगात आमचो’ या लोकसंपर्क उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमाद्वारे राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले. विधानसभा हे राज्यातील सर्वोच्च लोकशाही व्यासपीठ असून, जनतेच्या अपेक्षा आणि समस्या सभागृहात प्रतिबिंबित व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.


बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण तसेच स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांनी आपली मते आणि सूचना पाठवाव्यात, असेही त्यांनी म्हटले. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या मुद्द्यांवर आगामी अधिवेशनात प्रश्न, लक्षवेधी सूचना, चर्चा आणि इतर संसदीय माध्यमांतून आवाज उठविण्यात येईल, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.


हा उपक्रम विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डी’कोस्टा आणि आमदार ॲड. कार्लुस अल्वारीस फेरेरा यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. युवक, महिला, शेतकरी, मत्स्यव्यावसायिक, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केले आहे.


या उपक्रमासाठी नागरिकांना ई-मेल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या सूचना, तक्रारी आणि कल्पना पाठवता येणार असून, आगामी विधानसभा अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!