गोवा

सोलर फेरीबोटीचा धडा घ्या; कोची वॉटर मेट्रो दौऱ्यावरून प्रभव नायक यांचा सरकारला इशारा

मडगाव : मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी सरकारला भूतकाळातील अनुभवांमधून धडा घेण्याचे आवाहन केले आहे. मडगावचे आमदार तथा कॅप्टन ऑफ पोर्ट्स मंत्री दिगंबर कामत आपल्या कुटुंबीयांसह कोची वॉटर मेट्रोच्या पाहणी दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला.


प्रभव नायक  यांनी सांगितले की, यापूर्वीही तत्कालीन नदी परिवहन मंत्र्यांनी सोलार फेरी बोट प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी कोचीचा दौरा केला होता. कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागाने सदर सोलर फेरीबोट प्रकल्पाबाबत प्रतिकूल निरीक्षणे नोंदवूनही हा प्रकल्प पुढे रेटण्यात आला आणि अखेरीस सुमारे ३.९७ कोटींचा सोलार फेरी बोट प्रकल्प रद्द करावा लागला.


नायक यांनी मंत्री दिगंबर कामत यांच्या मुलाची तसेच अन्य एका कुटुंबीयाची या अधिकृत दौऱ्यातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते कोणत्या अधिकृत क्षमतेत या दौऱ्यावर सहभागी झाले आहेत? त्यांच्या प्रवास, निवास आणि इतर खर्चाचा भार सरकार उचलत आहे की तो वैयक्तिक निधीतून केला जात आहे, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी त्यांनी मागणी केली.


प्रभव नायक म्हणाले की, दिगंबर कामत यांनी अलीकडेच मडगावसाठी ७ कोटींच्या रोषणाई प्रकल्पाची घोषणा केली असून आता कोची वॉटर मेट्रोचा दौरा केला आहे. राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या काही महिन्यांत अशा महागड्या प्रकल्पांचा घेतला जाणारा पाठपुरावा पाहता, गोव्याच्या खऱ्या गरजांपेक्षा कमिशन मिळविण्याची धारणा निर्माण होत आहे, असे त्यांनी म्हटले.


“गोव्यातील जलमार्गांची भौगोलिक, भरती-ओहोटीची आणि कार्यपद्धतीची परिस्थिती केरळपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प सखोल तांत्रिक अभ्यास आणि स्थानिक परिस्थितीचे मूल्यमापन केल्याशिवाय तसाच्या तसा राबवू नये,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.


शेवटी, भविष्यातील सर्व जलवाहतूक प्रकल्प हे तज्ज्ञांच्या मतांवर, पारदर्शकतेवर आणि भूतकाळातील अनुभवांमधून घेतलेल्या धड्यांवर आधारित असावेत, जेणेकरून गोव्याच्या जनतेवर पुन्हा एखाद्या अयशस्वी आणि खर्चिक प्रकल्पाचा बोजा पडणार नाही, असे आवाहन प्रभव नायक यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!