google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘देर आये, दुरस्त आये! वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता…’

पणजी :

देर आये दुरस्त आये! विनाशकारी तमनार प्रकल्प कदापी पूर्ण होणार नाही, याची जाणीव वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना झाल्याचे दिसून येते. त्यांनी आता वेस्टर्न ग्रीडमधून वीज मिळवण्यावर भर द्यावा आणि राज्यात सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यावरही काम करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माध्यम प्रमुख अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.


पणजी येथे काँग्रेस भवनात मांद्रेचे गट अध्यक्ष नारायण रेडकर तसेच साळगावचे गट अध्यक्ष अतुल नाईक यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, अमरनाथ पणजीकर यांनी, इंडिया आघाडी सरकार जूनमध्ये सत्तेवर आल्यानंतर  तमनार प्रकल्पाचा समावेश असलेल्या तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होईल असे जाहिर केले व पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचा नाश करणारे प्रकल्प आणणाऱ्या भाजप सरकारवर टीका केली.


वेस्टर्न ग्रिडमधून कोलवाळे पर्यंत वीज आणण्याचा व तेथून पूढे शेल्डे वीज केंद्रापर्यंत वीज नेण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध असतानाही भाजप सरकारने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले हे कालच्या पत्रकार परिषदेतून वीजमंत्री सुदिन ढवळीकरानीच उघडे केले. जूनमध्ये सत्तेत येणारे इंडिया आघाडी सरकार या उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करुन पर्यावरण, वन आणि वन्यजीव वाचवेल, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोवा तमनार वीज प्रकल्पासाठी वाहिन्या टाकण्यासाठी वनक्षेत्र दुसरीकडे वळवण्याचा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेस सरकारने फेटाळला आहे. कर्नाटकच्या वन, इकोलॉजी आणि पर्यावरण खात्याचा सदर निर्णय पुढील पिढीसाठी जंगलाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा आहे. परंतू, गोव्यातील भाजप सरकार पर्यावरण, वन आणि वन्यजीव नष्ट करण्याच्या तयारीत आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिलेल्या माहितीवरून, गोव्यात एकूण सौरऊर्जा केवळ 46.97 मेगा युनिट्स तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी आता भाजपचे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेल्या वीजमंत्र्यांचे पूर्ण अपयश यातून समोर येते, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गेल्या 5 वर्षात वीज पारेषण आणि वितरण व्यवस्थेच्या सुधारणा आणि देखभालीवर सरकारने सुमारे 12000 कोटी खर्च करूनही वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे कालच्या पत्रकार परिषदेत 55 सरकारी कर्मचारी, 7 नागरिक आणि 17 जनावरांच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूंवर सोयीस्करपणे काहीही बोलले नाही याचे मला आश्चर्य वाटते, असे  अमरनाथ पणजीकर म्हणाले.

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज बिल थकबाकीदार असलेल्या औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांकडून विद्युत खाते 1400 कोटी कधी वसूल करणार याचे वेळापत्रक जाहीर करावे. असंवेदनशील भाजप सरकार  500 रुपयांची वीज बिलाची थकबाकी झाल्यास घरगुती ग्राहकांची वीज जोडणी तोडते, परंतु उद्योगपती आणि व्यावसायिकांना वर्षानुवर्षे थकबाकी ठेवण्याची परवानगी दिली जाते, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

देशात बदलाचे वारे वाहू लागल्याची जाणीव वीजमंत्री सुदिन ढवळीकराना झाल्यानेच तसेच तमनार प्रकल्प कदापी पूर्ण होणार नाही हे कळल्यानेच त्यांनी वेगळ्या मार्गाने वीज आणण्यावर भाष्य केले. इंडिया आघाडी सरकार गोव्यातील जनतेच्या भावना लक्षात घेवून पर्यायी मार्गाने वीज मिळवीणार असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!