गोवा

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा : प्रभव नायक

मडगाव :  “५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे. यासाठी रुग्णालयाचे आधुनिक सुविधा, विशेष वैद्यकीय विभाग आणि पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग असलेल्या पूर्णतः सुसज्ज टर्शयरी आरोग्य संस्थेत रूपांतर करणे आवश्यक आहे. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांसह संपूर्ण दक्षिण गोव्यातील रुग्णांना लाभ होईल,” अशी मागणी मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारने ५० एमबीबीएस जागांच्या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रभव नायक म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा टर्शयरी आरोग्य संस्थेत उंचावण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. विद्यमान सरकारी रुग्णालयातील रिकामे मजले वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरण्यात यावेत.

गेल्या तीन वर्षांपासून मडगावचो आवाज दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत सातत्याने आवाज उठवत असून, आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनेही सादर केली आहेत. रुग्णवाहिकांची कमतरता, अपुऱ्या खाटांची संख्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून, या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

मडगावचो आवाजने रुग्णालयात ऑनलाइन पेमेंट सुविधेचा अभाव तसेच प्रभावी देखभाल, योग्य स्वच्छता व्यवस्था, साफसफाई आणि कार्यक्षम व्यवस्थापनाची गरजही अधोरेखित केली आहे. रुग्णांना सुरक्षित आणि रुग्णस्नेही वातावरण मिळण्यासाठी या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

प्रस्तावित प्रकल्पात आधुनिक निदान सुविधा, विशेष वैद्यकीय विभाग, पुरेशा खाटा, चोवीस तास आपत्कालीन सेवा, आवश्यक रुग्णवाहिका आणि पात्र वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत. विद्यमान इमारतीतील उपलब्ध मजल्यांचा शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा आणि व्याख्यान कक्षांसाठी वापर करण्याबाबत नियोजन करावे. आवश्यकतेनुसार उपलब्ध जागेची पुनर्रचना करून तिचा प्रभावी वापर करावा, अशा सुचना प्रभव नायक यांनी केल्या आहेत.

मडगावचो आवाजने गोवा सरकारला प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात स्थापन करून रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कालमर्यादित आराखडा तयार करण्याचे आवाहन केले आहे. उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिकाधिक वापर करून सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करणे, तसेच दक्षिण गोव्यातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि प्रगत उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!