मस्क यांच्या Starlinkला भारतात मिळाली परवानगी!
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीला मोठे यश मिळाले आहे. या कंपनीला अखेर भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
ही सेवा भारतीयांसाठी लॉन्च करण्याची कंपनीला अनेक वर्षांपासून इच्छा होती. एकदा त्यांनी आगाऊ बुकिंगही सुरू केले होते. परंतु, सरकारी परवानगी न मिळाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे OneWeb आणि Jio Satellite Communications नावाच्या दोन कंपन्यांना देशात सॅटेलाइट ब्रॉडबँड लाँच करण्यासाठी सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाली आहे. आता या मालिकेतील स्टारलिंक हे तिसरे नाव ठरणार आहे.
केंद्र सरकारने याबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा प्रदाते प्रशासकीय माध्यमातून स्पेक्ट्रम मिळवू शकतात. ज्या कंपन्यांना त्यांच्या सेवा भारतात आणायच्या आहेत त्यांच्यासाठी हा एक प्लस पॉइंट आहे. स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
२०२२ मध्ये स्टारलिंकला मोठा धक्का बसला होता. कंपनीला तेव्हा भारत सरकारकडून परवाना मिळेल अशी आशा होती. सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी प्री-ऑर्डर घेण्यासही सुरुवात केली होती. ५ हजारांहून अधिक ग्राहकांनी सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी बुकिंग केले होते. काही वेळाने बुकिंगची रक्कम परत मिळू लागली. त्यानंतर SpaceX च्या सॅटेलाइट इंटरनेट डिव्हिजन स्टारलिंकने सांगितले होते की दूरसंचार विभागाने तसे करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून स्टारलिंकला भारत सरकारकडून सेवा सुरू करण्याचा परवाना मिळू शकलेला नव्हता.