
मंगेशीत वटवृक्ष उन्मळला; गोविंद गावडे यांचे तातडीचे मदतकार्य
फोंडा :
मंगेशी येथील श्री गणेश मंदिर परिसरातील कित्येक वर्षे जुना आणि विशाल वटवृक्ष सोमवारी अचानक उन्मळून पडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वृक्ष रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुर्घटना घडली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशमन दलाला त्वरित पाचारण केले तसेच मदतकार्याचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे उन्मळून पडलेल्या विशाल वटवृक्षाचे तुकडे करून तो हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर रस्ता आणि मंदिर परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आला. त्यामुळे वाहतूकही पूर्ववत करण्यात आली.
यावेळी गोविंद गावडे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत घाबरून न जाण्याचे आवाहन केले. प्रशासनाकडून सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून परिसर सुरक्षित असल्याचा दिलासाही त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांनीही आमदार, प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल समाधान व्यक्त केले.







