
‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला गोव्याचा पाठिंबा : मुख्यमंत्री
पणजी :
‘एक देश, एक निवडणूक’ (वन नेशन, वन इलेक्शन) ही संकल्पना देशाच्या विकासाला गती देणारी असून ‘विकसित भारत २०४७’ या उद्दिष्टपूर्तीसाठी ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. या संकल्पनेला गोवा सरकार आणि गोमंतकीयांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
घटनेच्या १२९ व्या घटनादुरुस्ती विधेयक, २०२४ संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत बाणावली येथे मुख्यमंत्री सावंत बोलत होते. समितीचे अध्यक्ष खासदार पी. पी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समिती दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून विविध राज्यांकडून या प्रस्तावाबाबत सूचना आणि मते जाणून घेत आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी देशात सातत्याने विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असल्याने प्रशासन, धोरणात्मक निर्णयप्रक्रिया आणि विकासकामांवर परिणाम होतो. वारंवार लागू होणारी आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रिया यामुळे शासनाचे लक्ष विकासकामांवर केंद्रित करण्यात अडथळे निर्माण होतात.
लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्यास शासनाला विकास, सुशासन आणि दीर्घकालीन धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पना पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री सावंत यांनी अभिनंदन केले.






