गोवा

मडगावच्या मुख्याधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मडगाव : मडगाव नगरपालिका उद्यानात भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याविरोधात निष्काळजीपणाबद्दल गुन्हा (एफआयआर) दाखल करण्याची मागणी ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.


या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना नायक म्हणाले की, सार्वजनिक उद्यान हे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि कुटुंबीयांनी सुरक्षितपणे वेळ घालवण्याचे ठिकाण असते. मात्र भरदिवसा घडलेल्या हिंसक घटनेमुळे नगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचे अपयश समोर आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत मडगाव नगरपालिकेसाठी २५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या सुरक्षा रक्षकांची नेमकी तैनाती कुठे आहे आणि घटना घडली त्यावेळी ते उद्यानात उपस्थित का नव्हते, याचे स्पष्टीकरण नगरपालिकेने द्यावे, अशी मागणी नायक यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.


मडगावकरांना जागृत होण्याचे आवाहन करणाऱ्यांवर टीका करताना नायक म्हणाले की, मडगावचे नागरिक आधीपासूनच सजग आहेत आणि शहराशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत आहेत. नगरपालिका उद्यानाच्या काँक्रीटीकरणाविरोधातील आंदोलन, कथित ‘सोपो’ वसुलीच्या विरोधातील मोहीम तसेच रेंट-अ-कार व्यवसायाशी संबंधित समस्यांवर ‘मडगांवचो आवाज’ने सुरू केलेल्या मोहिमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.


‘मडगाव कनेक्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याचे काम सुरू असल्याचे नायक यांनी सांगितले. हिरवे, स्वच्छ, सुरक्षित आणि संरक्षित मडगाव घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांशी होणारा संवाद शहराच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले.


मडगाव नगरपालिका उद्यानातील मारहाण प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची सखोल चौकशी करून मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याविरोधात निष्काळजीपणाबद्दल तातडीने एफआयआर दाखल करावा, अशी मागणी गोवा पोलिसांकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!