
चेन्नईतील मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे गिरीश चोडणकर यांच्या हस्ते उद्घाटन
चेन्नई : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC)चे अध्यक्ष तथा तमिळनाडूचे माजी अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) प्रभारी गिरीश चोडणकर यांच्या हस्ते चेन्नईतील मांडवेली येथील सेंट जॉन्स सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षक शिक्षणाच्या क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला शाळेच्या करस्पाँडंट व वरिष्ठ प्राचार्या डॉ. नलिनी विल्सन, संचालिका श्रीमती विनीता रोशन, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, मान्यवर पाहुणे आणि प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राच्या भवितव्याची जडणघडण शिक्षकांच्या हातून होत असते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्यासाठी केलेली गुंतवणूक ही समाजाच्या आणि देशाच्या भविष्यासाठी सर्वात मोलाची गुंतवणूक आहे. सक्षम, संवेदनशील आणि प्रशिक्षित शिक्षकच भावी पिढीचा बौद्धिक, भावनिक आणि नैतिक विकास घडवू शकतात.
सेंट जॉन्स सीनियर सेकंडरी स्कूलने गेल्या ५७ वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवल्या असल्याचे नमूद करत त्यांनी मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण संस्थेची स्थापना ही संस्थेच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले. बालशिक्षणासाठी कुशल आणि समर्पित शिक्षक तयार करण्यात या संस्थेची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामागील दूरदृष्टी आणि समर्पित नेतृत्वाबद्दल डॉ. नलिनी विल्सन आणि विनीता रोशन यांचे चोडणकर यांनी अभिनंदन केले. या उद्घाटन सोहळ्याचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या शिक्षक शिक्षणासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
शेवटी त्यांनी संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी शिक्षकांना शुभेच्छा देत, बालमनांच्या जडणघडणीत आणि राष्ट्रनिर्मितीत या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला.







