
विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी अर्ज मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले.
न्यायालयीन सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. न्यायालयाने याबाबत विचारणा केल्यानंतर संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर न्यायालयाने प्रकरण बंद केले.
संगीता यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. जवळपास २७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा अंत करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणामुळे विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी चर्चा रंगली होती.
मात्र, आता अर्ज मागे घेतल्याने या बहुचर्चित प्रकरणावर पडदा पडला आहे. विजय किंवा संगीता यांच्याकडून या घडामोडीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.






