भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान!
भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान असतील.
सत्ताधारी हुजूर पक्षाच्या ‘१९९२ समिती’ने सुनक यांना पक्षाचा नेता म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच सुनक आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. हंगामी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून ते पंतप्रधापदाचा पदाभार स्वीकारतील.
ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. मात्र पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. यावेळी मात्र हुजूर पक्षातील खासदारांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची शर्यत जिंकली आहे.