
बलुचिस्तानने स्वतःला घोषित केले ‘स्वतंत्र देश’
पाकिस्तानला बलुचिस्तानकडून सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वत:ची स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली आहे. बलुचिस्तानकडून करण्यात आलेल्या या घोषणेचे एक निवदेन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या निवेदनात बलुचिस्तानने ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. प्रादेशिक वादाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
द रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान अशा अशा मथळ्याने हे निवेदन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या निवेदनाची सत्यता पूर्णपणे तपासण्यात आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या या निवदेनात रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या संरक्षण आणि सुरक्षा दलांनी बलुचिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले आहे, असा दावा करण्यात आला आहे. १३ जुलै २०२६ तारखेचे हे पत्रक आहे. पत्रकाच्या सुरुवातीलाच बलुचिस्तानची स्वतंत्र देश म्हणून घोषणा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रगीत, ध्वजाची घोषणा
याशिवाय बलुचिस्तानचे वेगळे राष्ट्रीय गीत, राष्ट्रीय ध्वज, स्वत:चे राष्ट्रीय चलन (बलोची फालूस) निर्माण केल्याचा दावा या पत्रकात करण्यात आला आहे. “यामुळे बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, आम्ही आता येथील सोने आणि कॉपरच्या खाणीवर नियंत्रण मिळवले असून, आमच्याकडे १५० सुरु असणाऱ्या गॅसचे क्षेत्र आणि १,२०० कोळसा खाणींवर बलुचिस्तानचे नियंत्रण असेल”, असे व्हायरल होणाऱ्या पत्रकात म्हटले आहे. बलुचिस्तानने स्वत:च्या संरक्षण दलाची देखील घोषणा केली आहे.
“आमच्याकडे सध्या लढाई विमानं, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, क्षेपणास्त्र किंवा दारुगोळा नसेल पण, आमचे भूभागावर नियंत्रण आहे. पाच लाख जणांचा समावेश असलेली बलुचिस्तानचे लष्कर, नौदल, हवाई आणि नागरी प्रशासन २०२६ च्या अखेरपर्यंत पाकिस्तानला भूभागावरून हकलून देण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानच्या लष्करात असणारे बुलिस्तानचे नागरिक आता राजीनामे द्यायला लागले आहेत”, असेही या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या असंतोषाचा सामना करत असताना बलुचिस्तानमधून त्यांना मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचार, अपहरणांच्या घटना आणि इतर दडपशाहीबाबत बलुचिस्तानच्या नेत्यांनी आणि नागरिकांनी वारंवार आवाज उठवला आहे. अशात बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.







