गोवा

सेंट थॉमसमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती

म्हापसा : सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय, आल्दोना यांनी आपल्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त गोवा पोलीसांच्या अँटी नार्कोटिक सेल आणि म्हापसा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून जबाबदार, शिस्तप्रिय आणि सामाजिक भान असलेले विद्यार्थी घडविण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना सेवेद्वारे झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रहारी क्लब, आपत्ती व्यवस्थापन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), युवा रेड क्रॉस (YRC), रेड रिबन क्लब, इको क्लब आणि ग्राहक क्लब यांच्या स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या अँजेलिका फर्नांडिस यांनी सर्व विद्यार्थी सदस्यांना कर्तव्यनिष्ठेची शपथ दिली.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फा. रॉक्सी फर्नांडिस, प्राचार्या अँजेलिका फर्नांडिस, अँटी नार्कोटिक सेल, पणजीचे पोलीस उपनिरीक्षक (PSI)  दिनदयालनाथ रेडकर, म्हापसा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवीना सावंतोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अजय गावंकर, एलपीसी स्नेहा मयेकर, भाव्या गावंकर तसेच अँटी नार्कोटिक सेलचे पोलीस शिपाई किशन मांद्रेकर आणि रोहित नाईक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना व्यवस्थापक रेव्ह. फा. रॉक्सी फर्नांडिस यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिस्त, जबाबदारी आणि सुदृढ, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले.

पोलीस उपनिरीक्षक दिनदयालनाथ रेडकर यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यांचे घातक परिणाम सविस्तरपणे समजावून सांगितले. “अमली पदार्थ तुमचे जीवन अधोगतीकडे नेतात – जीवनाला होकार द्या, अमली पदार्थांना नकार द्या” हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्याचे, मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याचे आणि स्वतःचे, कुटुंबाचे तसेच समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.

पोलीस उपनिरीक्षक रवीना सावंतोडकर यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करताना वैयक्तिक सुरक्षितता, जबाबदार वर्तन आणि वाईट सवयींपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच वैध वाहन परवाना नसताना दुचाकी चालवू नये, असा सल्ला देत विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅलिस मथायस यांनी केले. कार्यक्रमाचे एकूण समन्वयन अमरनाथ पणजीकर , जोजफीन डिसोझा, डॅरिल अब्रांचिस तसेच विविध क्लबचे प्रभारी शिक्षक आणि अध्यापकवर्ग यांनी केले.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि निरोगी जीवनशैलीची मूल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त करत हा ३४ वा स्थापना दिन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात  झाला.

Anti-Drug Awareness Programme at St. Thomas Higher Secondary School

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!