
पणजी : अयोध्येतील राम मंदिरासाठी देशभरातील नागरिकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या हिमाचल प्रदेश व चंदीगडच्या प्रभारी तथा माजी खासदार रजनी पाटील यांनी रविवारी केली.
पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार अॅड. कार्लोस फेरेरा, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ panajeekar आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक उपस्थित होते.
रजनी पाटील म्हणाल्या की, देशातील शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून राम मंदिरासाठी देणग्या दिल्या. मंदिर उभारणीबाबत सर्वांचाच पाठिंबा होता. मात्र, आता या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कथित गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून त्याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
राम मंदिर न्यासाची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. मात्र, या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही. या कथित गैरव्यवहारामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, असेही त्या म्हणाल्या.
राम मंदिर न्यासाचे अध्यक्ष चंपत राय यांनाही या प्रकरणात चौकशीला सामोरे जावे आणि त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस फेरेरा म्हणाले की, या प्रकरणात गुन्हे दाखल करून संपूर्ण गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. “केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये. श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचा गैरवापर झाला असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले की, प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. मात्र, त्यांच्या नावाचे राजकारण केले जात असून मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांबाबत उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर भाजप नेतृत्व मौन बाळगत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.







