गोवा

गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात

पणजी (प्रतिनिधी) :
गोव्यात प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी आता पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विशेष विनंतीनंतर या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



पणजी येथील कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याच्या नव्या इमारतीचे व टर्मिनलचे उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बंदरे मंत्री दिगंबर कामत, जलवाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे (एमपीए) अध्यक्ष एन. विनोदकुमार, कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टाव्हियो रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.


सोनोवाल यांनी सांगितले की, कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर गोव्यात पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. याशिवाय, मुरगाव बंदर प्राधिकरणामार्फत सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये बर्थ क्रमांक ९ चे पुनर्विकास, नवीन मासेमारी बंदर, वास्को बे प्रकल्प, कॅपिटल ड्रेजिंग तसेच आधुनिक शिपयार्ड उभारणीचा समावेश आहे.


यावेळी सोनोवाल यांनी ‘अंतर्गत जहाज कायदा, २०२१’ची प्रभावी अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुक केले. प्रस्तावित गोवा मेरीटाईम बोर्ड, जहाजबांधणी व दुरुस्ती धोरण आणि सागरी क्षेत्रासाठीचा मास्टर प्लॅन राज्याच्या विकासाला चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, राज्यात दररोज सुमारे ५० हजार प्रवासी जलमार्गांचा वापर करतात. नव्याने सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेमुळे या संख्येत आणखी वाढ झाली असून, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे गोव्यातील सार्वजनिक जलवाहतुकीला नवे स्वरूप मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!