गोवादेश/जग

निधी गोव्याचा, खर्च उत्तर प्रदेशात ; काँग्रेसची तानावडेंवर टीका

पणजी :
राज्यसभा खासदार सदानंद म्हाळू शेट तानावडे यांनी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (एमपीएलएडीएस) अंतर्गत उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे एलईडी हायमास्ट दिव्यांसाठी ४८.६० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आक्षेप घेतला आहे. गोव्यातील विकासकामे प्रलंबित असताना राज्याबाहेरील प्रकल्पासाठी निधी खर्च करण्यात आल्याची टीका काँग्रेसच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

पणजीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोव्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रस्ते, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था, क्रीडा सुविधा आणि समाजमंदिरे यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची गरज असताना एमपीएलएडीएस निधी दुसऱ्या राज्यातील कामांसाठी वापरणे योग्य नाही.

खासदार म्हणून तानावडे यांच्या एमपीएलएडीएस निधीच्या वापराबाबतची कामगिरीही समाधानकारक नसल्याचा दावा त्यांनी केला. सार्वजनिकरीत्या उपलब्ध आकडेवारीनुसार मंजूर करण्यात आलेल्या २९ प्रकल्पांपैकी केवळ सहा प्रकल्प पूर्ण झाले असून, निधीचा वापर सुमारे १९.४ टक्के झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावरून विकासकामांच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यसभेत गोव्याच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याची अपेक्षा व्यक्त करत पणजीकर यांनी गोव्याच्या एमपीएलएडीएस निधीचा वापर उत्तर प्रदेशातील प्रकल्पासाठी का करण्यात आला, गोव्यातील सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत का आणि राज्यातील प्रलंबित गरजा असताना निधीचा प्रभावी वापर का झाला नाही, याबाबत तानावडे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!