
बाह्य संस्थांच्या शालेय कार्यक्रमांवर शिक्षण खात्याचे निर्बंध
पणजी : गोव्यातील शाळांमधील शैक्षणिक वातावरण सुरक्षित, तटस्थ आणि अभ्यासकेंद्रीत राखण्यासाठी शिक्षण संचालनालयाने नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. यानुसार, कोणत्याही बाह्य व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला विद्यार्थ्यांशी संवाद, व्याख्यान, चर्चासत्र, जनजागृती कार्यक्रम किंवा अन्य उपक्रम आयोजित करण्यापूर्वी शिक्षण खात्याची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि विशेष शाखेच्या पोलिसांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. काही संघटनांच्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्यात स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) या संघटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
परिपत्रकानुसार, शाळांमध्ये शिक्षणाशी संबंधित नसलेले किंवा सांप्रदायिक स्वरूपाचे उपक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी मागताना संबंधित संस्थेची माहिती, वक्त्यांची नावे आणि कार्यक्रमाचा संपूर्ण आराखडा शिक्षण खात्याकडे सादर करावा लागणार आहे.
परवानगी मिळालेल्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान संबंधित शाळेतील जबाबदार शिक्षक किंवा प्राध्यापक उपस्थित राहणे अनिवार्य असेल. कार्यक्रमानंतर संस्थेच्या प्रमुखांना कार्यक्रमाचा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे सादर करावा लागणार असून, विद्यार्थ्यांना कोणतीही आक्षेपार्ह अथवा अनधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचे प्रमाणित करावे लागेल.
शाळांमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची माहिती तातडीने स्थानिक पोलिस आणि शिक्षण संचालनालयाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बाह्य अभ्यागत आणि आयोजित कार्यक्रमांची स्वतंत्र नोंद ठेवणे सर्व शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
शिक्षण संचालनालयाचे विभागीय अधिकारी या निर्देशांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश सिनाय झिंगडे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.






