
सेवा दलाकडून गावागावात पोहोचण्याचा संकल्प
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दलाची कार्यकारिणी बैठक सोमवारी पणजी येथील काँग्रेस भवनात पार पडली. बैठकीत उत्तर गोव्यात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे, दक्षिण गोव्यात एकदिवसीय कार्यशाळा, तसेच ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार आणि ‘जनक्रांती यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला गोवा प्रभारी कल्पना जोशी तसेच गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि सेवा दलाचे प्रभारी विजय भिके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस सेवा दलाचे नवनियुक्त राष्ट्रीय मुख्य संघटक बी. व्ही. श्रीनिवास यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संघटनात्मक विषयांवर चर्चा करताना उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील सेवा दलाची संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. आगामी दिल्ली अधिवेशनाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मतदारसंघ स्तरावर ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ‘चलो गाव की ओर’ या अभियानांतर्गत सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी गावांमध्ये जाऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांशी संवाद साधावा, त्यांच्यासोबत एक रात्र वास्तव्यास राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे ठरविण्यात आले.
याशिवाय ‘रवि मिलन’ उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस कल्पना जोशी, राजेन घाटे, के. नमशीकर, कुलकर्णी, रोझा अँथोनेट डायस, मारिया सिमॉन्स, दामोदर शिरोडकर, बाळकृष्ण मानेरकर यांच्यासह सेवा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचा समारोप गोव्यात काँग्रेस सेवा दलाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा आणि आगामी कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त करून झाला.






