‘आमच्या अस्मितेसाठी कोंकणी जपली पाहिजे’
पणजी :
राजभाषा कोकणी ही अधिकृत कामांसाठी वापरली जावी आणि अनेक व्यासपीठांवरून तिचा प्रचार व्हायला हवा, असे मत काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी रविवारी व्यक्त केले.
गोव्यातील जनतेला राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना पणजीकर म्हणाले की, कोकणीप्रेमींमुळे आणि त्यांच्या ५५५ दिवसांच्या आंदोलनामुळे कोकणीला ओळख मिळण्यास मदत झाली.
“माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्यातील लोकांना प्रथम राजभाषेचा निर्णय घेण्यास मदत केली, जी घटकराज्यासाठी मूलभूत निकष होती. नंतर 4 फेब्रुवारी 1987 रोजी गोवा विधानसभेने राजभाषा विधेयक मंजूर करून कोकणीला गोव्याची राजभाषा बनवले,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने 20 ऑगस्ट 1992 रोजी सत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कोकणीचा समावेश करण्यात आला.
“३० मे १९८७ रोजी राजीव गांधींनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. आता कोकणी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. सरकारने गोवा कोकणी अकादमीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करावेत आणि तरुणांना साहित्य निर्मितीसाठी पाठिंबा द्यावा,” असे ते म्हणाले.