तळागाळातील कार्यकर्तेच काँग्रेसचा आत्मा आहेत : मोरेनो रिबेलो
मडगाव :
काही स्वार्थी घटक बेजबाबदार विधाने करून काँग्रेस पक्षाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला छूपा राजकीय अजेंडा साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाला नगण्य लेखण्याचा प्रयत्न करू नये. आघाडी राजकारण धर्म पाळताना सर्वांनी एकमेकांच्या सामर्थ्याचा आणि कमकुवतपणाचा आदर करणे आवश्यक आहे, असा इशारा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी दिला आहे.
तळागाळातील कार्यकर्ते हेच काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण, मेहनत, बांधिलकी यामुळेच काँग्रेस पक्षाला भूतकाळातील राजकीय उलथापलथींवर यशस्वीपणे मात करण्यात मदत झाली आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या भल्यासाठी काँग्रेस नेहमीच दिशादर्शक म्हणूनच अग्रेसर राहणार आहे, असे मोरेनो रिबेलो यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यापासून भारताला 21व्या शतकात नेण्यापर्यंत कॉंग्रेसने योगदान दिले आहे. आमच्या सर्व दूरदर्शी नेत्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान दिले आहे. आपल्या सुंदर गोव्याला पूढे नेण्यासाठी काँग्रेस आपले योगदान देत राहील, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.
कधीकधी, काही कारणांमुळे काही निर्णय घ्यावे लागतात. परंतू, याचा अर्थ असा नाही की आपण पक्षाची विचारधारा गुंडाळून ठेवली आहे. काँग्रेस पक्षाची मूल्ये माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पुढे नेतच राहतील, असे मोरेनो रिबेलो यांनी सांगितले.
गोव्यातील अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाकडून राजकारणाचे धडे घेतले. आज ते विविध पक्षांमध्ये आहेत. आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले आहेत आणि त्यामुळेच कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना कॉ्ग्रेसचा घात करुन पक्षांतर करणाऱ्यांच्या मतदारसंघात भरघोस मते मिळू शकली, असा टोला मोरेनो रिबेलो यांनी हाणला.
मी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून एकसंघ राहण्याचे आवाहन करतो. काँग्रेस पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे. इंडिया ब्लॉकचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष करत आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा आमच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांकडून नेहमीच आदर केला जाईल, असा दावा मोरेनो रिबेलो यांनी केला.